लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केला. असा एकूण ४९ लाख २६ हजार ९३ रुपयांचा मुद्देमाल लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते फिर्यादींना साभार परत करण्यात आला.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हॉलमध्ये पार पडलेल्या छोटेखाणी कार्यक्रमात लातूर जिल्हयातील मागील एका महिन्यात चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराकडून हस्तगत केलेला किंमती मुद्देमाल व नागरीकांची ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रोजी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते नागरीकांना साभार परत देण्यात आले. यामध्ये चोरी, घरफोडी अशा ७ गुन्ह्यातील किंमती मुद्देमाल सोने, चांदी व रोख एकुण किं. ९ लाख ४१ हजार ६५, वाहन चोरी ३ गुन्ह्यातील मोटार सायकल व ट्रॅक्टर असा मुद्देमाल एकुण किंमत २ लाख ७२ हजार रूपये, मोबाईल चोरीचे ३३ मोबाईल फोन एकूण किंमत ४ लाख ८ हजार ४९९ रूपये ऑनलाईन फसवणूक झालेली १६ गुन्ह्यातील रोख रक्कम एकूण ३३ हजार ४ हजार ५२९ रूपये असा एकूण ९ पोलीस स्टेशन अंतर्गत ५९ गुन्ह्यातील किंमती मुदेमाल, वाहने, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल फिर्यादीस परत देण्यात आला. एकूण ४९ लाख २६ हजार ९३ रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादीस परत देण्यात आला आहे.
तसेच फेब्रुवारी २०२५ मध्ये पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे वार्षीक तपासणी दरम्यान लातूर जिल्ह्यातील एकूण ६४ गुन्ह्यातील एकूण ६८ लाख १५ हजार २१ रुपये किमतीचा मुद्देमाल (सोने, चांदी, मो.सा, मोबाईल फोन, रोख) पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड-परिक्षेत्र नांदेड यांचे हस्ते नागरीकास/तक्रारदारास परत देण्यात आला आहे.