पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एक गाडीत जवळपास ५ कोटी रुपये सापडल्याने खळबळ माजली आहे. ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या वर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रकरणाची चौकशी होवून दूध का दूध पानी का पानी होईल.
दरम्यान, संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांचा एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन शेअर केला. या व्हिडीओत पुण्यात खेड-शिवापूर परिसरातून जप्त करण्यात आलेल्या रक्कमेबद्दलची माहिती दिसत आहे. त्यावर संजय राऊतांनी चांगलाच निशाणा साधला.
याच मुद्यावरून आता विरोधकांनी सत्ताधा-यांना धारेवर धरण्यासही सुरूवात केली आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित दादा यांच्याकडून पैशाचं वाटप सुरू केले आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.. ज्या गाडीत ही रक्कम सापडली ती गाडी मिंधे टोळीतील एका आमदाराची असल्याचे त्यांनी म्हटले.
विशेष म्हणजे तो आमदार कोण याचाही उल्लेख त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला आहे. हा मुद्दा सध्या चांगलाच गाजत असून त्यावरूनच अजित पवारांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट उत्तर देत म्हणाले, चौकशी करा ना, काही जण बिनबुडाचे आरोप करतात. ज्याचे पैसे सापडले आहेत,त्याच्यासंदर्भात चौकशी करावी. दूध का दूध आणि पानी का पानी पुढे येईल, सगळे स्पष्ट होईल.
‘लाडकी बहीण’ गेमचेंजर ठरेल
लाडकी बहीण गेमचेंजर ठरेल, चांगली योजना आहे. महिलांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. पण ही योजना थांबवली अशी बातमी काही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधून पसरवण्यात आलेआहे, पण ते धादांत खोटे आहे. मी आपल्याला स्पष्टच सांगतो की या योजना पुढेही चालू ठेवण्यासाठीच काढल्या आहेत, पण काही वृत्तपत्रांनी आणि काही चॅनेल्सनी यात खोडसाळपणा का केला हे समजत नाही.