30.7 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श

छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श

मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितले

नागपूर : प्रतिनिधी
पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. नागपुरात ‘युगंधर शिवराय नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ’ या पुस्तकाच्या विमोचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत अशी काही विधाने करतात की यामुळे ब-याचदा संघ गोत्यात येतो. त्यांनी केलेल्या विधानाबाबत सर्वत्र चर्चासुद्धा रंगते. असेच काहीसे विधान आता पुन्हा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. पुढे बोलताना भागवत म्हणाले, तत्त्वरूप काम करणारा संघ व्यक्तिवाद मानत नाही, असेही यावेळी भागवतांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, शिवाजी महाराजांनी भरीव काम करून ठेवले आहे.

त्यामुळेच डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस या संघाच्या पहिल्या तीनही सरसंघचालकांनी वेगवेगळ्या काळात हे सांगून ठेवले आहे की संघाचे काम जरी तत्त्वरूपी असले आणि संघ व्यक्तिवाद मानत नसला, तरी काही साकार आदर्श लागतातच. त्यासाठी पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय दुसरे आदर्श नाहीत. त्यामुळे आज अडीचशे वर्षांनंतरही शिवाजी महाराज हेच प्रेरणा आणि आदर्श आहेत असे मोहन भागवत म्हणाले.

सिकंदरपासून देशात एकानंतर एक परकीय आक्रमणे होत असताना आणि इस्लामिक आक्रमणात सर्व काही उद्ध्वस्त होईल अशी स्थिती असताना शिवाजी महाराजांनी उपाय दिला. शिवाजी महाराज आग््रयातून सुखरूप परत येतील की नाही, अशी सर्वांना शंका असताना, महाराज परत आले. राज्य पुन्हा बळकट केले आणि त्यानंतरच भारतात परकीय सत्तेची सद्दी संपली आणि बुंदेलखंड, राजस्थान, मुघलांपासून मुक्त झाले, असेही भागवतांनी सांगितले. तर, भारताच्या सतत पराजयाचे युग बदलले, शिवाजी महाराजांनी ते बदलले आणि ही स्थिती पुढेही कायम राहावी यासाठी जे काही करावे लागत होते, ते सर्व शिवाजी महाराजांनी करून ठेवले होते. म्हणूनच शिवाजी महाराज तेव्हापासून आजपर्यंत आपले आदर्श आहेत, असे मोहन भागवतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR