१५ ऑगस्टचा मुहूर्त, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आला पूल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पूल चिनाब रेल्वे ब्रिजवर भारतीय रेल्वे दिमाखात धावणार आहे. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे. सांगलदन ते रियासी दरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा भाग आहे.
२० जून २०२४ रोजी या पुलावर ट्रेनची ट्रायल रन झाली होती. यापूर्वी १६ जून रोजी या पुलावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली होती. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा २९ मीटर उंच आहे. आयफेल टॉवरची उंची ३३० मीटर आहे तर १.३ किमी लांबीचा हा पूल चिनाब नदीवर ३५९ मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. हा पूल ४० किलोपर्यंतची स्फोटके आणि ८ रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. पाकिस्तानी सीमेपासून त्याचे हवाई अंतर केवळ ६५ किमी आहे. हा पूल उघडल्यानंतर काश्मीर खोरे भारताच्या इतर भागांशी प्रत्येक मोसमात गाड्यांंद्वारे जोडले जाणार आहे.
यूएसबीआरएल प्रकल्प १९९७ मध्ये सुरू झाला. या अंतर्गत २७२ किमीचा रेल्वेमार्ग टाकण्यात येणार होता. आतापर्यंत विविध टप्प्यांत २०९ किमीची लाईन टाकण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस रियासी ते कटरा जोडणारी शेवटची १७ किमीची लाईन टाकली जाणार आहे. त्यानंतर प्रवाशांना जम्मूमधील रियासी ते काश्मीरमधील बारामुल्ला असा प्रवास करता येणार आहे.
स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण होऊनही काश्मीर खोरे बर्फवृष्टीच्या काळात देशाच्या इतर भागांपासून तुटलेले राहिले. २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत काश्मीर खो-यात फक्त राष्ट्रीय महामार्ग-४४ वरूनच पोहोचता येत होते. काश्मीर खो-याकडे जाणारा हा रस्ताही बर्फवृष्टीमुळे बंद असायचा. याशिवाय काश्मीरला जाण्यासाठी गाड्या जम्मू-तवीपर्यंत जात होत्या. तेथून लोकांना रस्त्याने सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. जवाहर बोगद्यातून जाणा-या या मार्गाने जम्मू-तावीहून घाटीत जाण्यासाठी लोकांना ८ ते १० तास लागायचे. आता मात्र नागरिकांची चांगलीच सोय होणार आहे.
२००३ मध्ये चिनाब
पूल बांधण्याचा निर्णय
भारत सरकारने २००३ मध्ये सर्व हवामान आधारावर काश्मीर खो-याला देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी चिनाब पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी सरकारने चिनाब ब्रिज प्रकल्पालाही मान्यता दिली. हा पूल २००९ पर्यंत तयार होणार होता. मात्र, तसे झाले नाही. आता जवळपास २ दशकांनंतर चिनाब नदीवर बांधलेला हा पूल तयार झाला आहे. हा पूल ४० किलोपर्यंतची स्फोटके आणि ८ रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. हा पूल पुढील १२० वर्षांसाठी बांधण्यात आला आहे.