सोलापूर— आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून प्रतिवर्ष प्रतिकुटुंब पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासंदर्भात राज्य शासनाने २३ जुलैला स्वतंत्र निर्णय काढला आहे. कर्करोग, बायपास सर्जरीसह तब्बल एक हजार ३६५ आजारांवर रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत.
त्यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रे तथा सेतू सुविधा केंद्रातून लाभार्थी गोल्डन कार्ड काढू शकतो. भविष्यात या योजनेत आणखी रुग्णालये वाढतील. ज्यांना या योजनेतून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घ्यायचे आहेत, त्यांनी गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव जोशी यांनी केले आहे. जिल्ह्यातील ३३ लाख ४७ हजार ५५५ लाभार्थी पाच लाखांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र ठरले आहेत.
२३ जुलै २०२३च्या शासन निर्णयानुसार आता सर्वांनाच आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. पण, त्यासाठी प्रत्येक लाभार्थीकडे आयुष्यमान गोल्डन कार्ड आवश्यक आहे. कुंभारी अश्विनी ग्रामीण रुग्णालय, रिलायन्स हॉस्पिटल कुंभारी, कासलीवाल बालरुग्णालय, चिडगूपकर रुग्णालय, ह्दयम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, गंगामाई रुग्णालय, सोलापूर कॅन्सर रुग्णालय, सिद्धेश्वर कॅन्सर रुग्णालय, रघोजी किडनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, युगंधर सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल) अशी शहरातील रुग्णालये मोफत उपचाराच्या योजनेत समाविष्ठ आहेत.
पिवळे रेशनकार्ड, अंतोद्य व अन्नपूर्णा योजनेतील शिधापत्रिकाधारक, केशरी रेशनकार्डधारक, शासकीय अनाथालयातील विद्यार्थी, शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रम, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील पत्रकार व त्यांचे कुटुंब, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडील नोंदणीकृत कामगार व त्यांचे कुटुंब हे सद्य:स्थितीत या योजनेसाठी पात्र आहेत. आता २३ जुलै २०२३च्या शासन निर्णयानुसार पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांसह शासकीय नोकरदार देखील या योजनेसाठी पात्र असतील, पण त्याची अंमलबजावणी अजून सुरु झालेली नाही.मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडूनही रुग्णांना विविध आजारांसाठी अर्थसहाय केले जाते. सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत १०२ रुग्णालयांची नोंदणी आहे. त्याठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना जास्तीत जास्त दोन लाखांची मदत मिळू शकते. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे रुग्णांनी अर्ज करणे अपेक्षित आहे.