टोकियो : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पुढील महिन्यात पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
माध्यमांशी बोलताना फूमियो किशिदा म्हणाले की, मी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) च्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही. पुढच्या महिन्यात नवीन अध्यक्ष निवडल्यानंतर मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. विवादास्पद युनिफिकेशन चर्चशी एलडीपीचे संबंध आणि राजकीय निधीमध्ये झालेला घोटाळा हा बहुचर्चित ठरला आहे. पक्ष निधी उभारणीच्या कार्यक्रमांमध्ये केलेल्या राजकीय देणग्यांबद्दल किशिदाचा सार्वजनिक पाठिंबा घसरला आहे. त्यामुळे किशिदा सरकारच्या विरोधात पक्षातूनच निषेधाचे आवाज उठवले जात आहेत. सध्याच्या सरकारच्या नेतृत्वाखाली पुढील सार्वत्रिक निवडणुका जिंकणे फार कठीण असल्याचे पक्षातील नेते म्हणत आहेत. जपानमध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत.
२०२१ मध्ये स्वीकारला होता पंतप्रधानपदाचा पदभार
योशिहिदे सुगाची यांच्या जागी फुमिया किशिदा यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. गेल्या एप्रिलमध्ये जपानमधील नागासाकी, शिमाने आणि टोकियो शहरांचा पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये सत्ताधारी एलडीपीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळीही किशिदा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती, मात्र किशिदा यांनी त्यावेळी पद सोडण्यास नकार दिला होता. अनेक दिवसांपासून किशिदा यांच्यावर पायउतार होण्याचा दबाव होता आणि आता अखेर त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केले.