मुंबई : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडले, सलाईन लावल्याने उपोषणाला अर्थ नाही असे म्हणत त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. दरम्यान, जरांगे पाटील यांनी भाजपसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जरांगेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी जरांगेंवर टीका केली. मराठ्यांसाठी सरकार जे जे शक्य ते करत आहे. जरांगेंचे मानसिक संतुलन ढासळले आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
जरांगेंच्या नौटंकीला मराठा आता भुलणार नाही, त्यांनी मराठा समाजाचा विश्वास गमावलाय. जरांगेंनी मविआची सुपारी घेतलीय हे स्पष्ट झाले आहे. जरांगेंना सत्तेची आस लागली आहे. आता पटोले आणि पवारांनी आरक्षणावर भूमिका सांगावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. जरांगेंच्या पोटात जे होते ते ओठात आले. जरांगेंनी मविआकडून सुपारी घेतलीय, लोक जरांगेंना प्रश्न विचारू लागले आहेत असेही दरेकर यांनी म्हटले.
जरांगे राजकारण करतात का या मुद्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, जरांगे एकीकडे म्हणतात राजकारणात रस नाही, दुसरीकडे याला पाडू, त्याला पाडू अशी भाषा करतात. जरांगेंनी निवडणुका लढवाव्यात, राजकारणात यावे. कुणाला निवडून आणणार, कुणाला पाडणार यातून सर्व दिसून आलेले आहे. मला राजकारणात रस नाही असे जरांगे म्हणतात मग राजकीय का बोलतात? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
जरांगेंच्या आंदोलनाला कुणाची फूस आहे हे स्पष्ट आहे. जरांगे फक्त भाजप आणि फडणवीसांना टार्गेट करतात. जरांगे यांच्यामागे कोण आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. जरांगेंनी मराठ्यांचे प्रश्न सोडले असून ते राजकीय ओरिएंटल झाले. त्यांची अपेक्षा आहे मला आता जेलमध्ये टाकावे. त्यांची प्रसिध्दी कमी झाली म्हणून त्यांचा हा अट्टाहास आहे असे दरेकर म्हणाले.