मुंबई : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांना मुस्लिम धर्मगुरूंनी धोका दिला म्हणून त्यांनी निवडणूक उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असावा, असा दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाजबांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
यावर मनसे नेते प्रतिक्रिया देत म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी का माघार घेतली हे तेच स्पष्ट सांगू शकतात. मनोज जरांगे साधा, सरळ, भोळा माणूस आहे. मुस्लिमांचे ठरलेले आहे की, कोणाच्या बाजूने मतदान करायचे आणि कोणाला विरोध करायचा आहे. मौलाना नोमानी यांचे जे वक्तव्य आहे, त्यातून हिंदू धर्म मानणा-या पक्षाच्या विरोधात मुस्लिमांना मतदान करायचा आहे. जे हिंदूंना आपले मानतात त्यांच्या विरोधात मुस्लिम मतदान करणार हे निश्चित आहे. त्यामुळे हिंदूंनी सुद्धा याचा विचार करावा, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील समाजासाठी काम करत आहेत. पुढेही ते समाजासाठी काम करत राहतील. मुस्लिम धर्मगुरूंनी जरांगे पाटील यांच्यासोबत जाण्यात फारशी रुची दाखवली नाही. मुस्लिम धर्मगुरूंनी जरांगे पाटील यांना फसवले, असे माझे मत आहे, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.