जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावर सौर ऊर्जा कंपनीने आपले बस्तान बसवलेले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाकडे अपारंपारिक ऊर्जा स्रोत म्हणून पाहिले जाते परंतु या अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताच्या नावाखाली जळकोट तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे यामुळे जळकोट तालुका वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे.
जळकोट हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात माळरान उपलब्ध आहे तसेच जळकोट तालुक्यामध्ये खरीप हंगाम वगळता इतर हंगामामध्ये शेतीमध्ये काही पिकत नाही , खरीप हंगामही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो कधी जास्त पाऊस तर कधी कधी पाऊस अशा लहरीपणामुळे शेतक-याला म्हणावे तसेच उत्पादन मिळत नाही. यामुळे सतत शेतकरी हार्दिक संकटात असतो. याच संधीचा फायदा घेत विविध सौर ऊर्जा कंपनीने आपला मोर्चा जळकोट तालुक्याकडे वळवला असून शेतक-यांच्या जमिनी लिजवर मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत . आज हजारो हेक्टर क्षेत्र सौर ऊर्जा कंपनीच्या ताब्यात गेलेले आहे. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत काळाची गरज असली तरीही ऊर्जा निर्मिती होत असताना निसर्गाचाही समतोल राखणे गरजेचे आहे परंतु जळकोट तालुक्यामध्ये जी सौर ऊर्जा कंपनी आहे.
त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे . सौर ऊर्जा कंपनी संबंधित शेतक-यांंची जमीन ताब्यात घेऊन जमिनीमध्ये असलेले वृक्ष तोडून टाकत आहे , यासोबतच शेतक-यांच्या शेतामध्ये कंपाउंड ओढले जात असल्यामुळे अन्य शेतक-यांचे रस्ते बंद होत आहेत. शेतक-यांना नकाशा प्रमाणे रस्ते उपलब्ध होत नाही, अशी
तक्रार देखील शेतक-यांनी केली होती. सौर ऊर्जा कंपनीने तलावामध्ये सोलारचे प्लेट बोरवेल बसवलेले आहेत तसेच तलावाच्या जागांमध्ये कंपाउंड वॉल केलेली आहे. यासोबतच शेतक-यांंचे रस्तेही अडविण्यात आले आहेत .या कंपनीच्या विरोधात माळहिपरगा येथील शेतक-यांंनी उपोषणही केले होते.