जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहरामध्ये प्रभाग क्रमांक १३ मध्ये बालाजी चंदावार यांचे घर ते कुणकी रोडपर्यंत सिमेंटचा रस्ता झाला परंतु या रस्त्यासोबत नालीचे बांधकाम झाले नाही. नालीचे बांधकाम न झाल्यामुळे घराचे पाणी तेथेच साठून राहत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना मलेरिया तसेच अन्य आजाराला सामोरे जावे लागत आहे. या प्रभागामध्ये नाली नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जळकोट शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील खूप जुना भाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागामध्ये यावर्षी सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. सिमेंट रस्त्याचे काम करण्यापूर्वी नालीचे बांधकाम होणे गरजेचे होते. असे न करता नगरपंचायतीने सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले. हे सिमेंट काम पूर्ण केल्यामुळे या रस्त्यावर घरे असलेल्या ठिकाणचे सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्थाच नाही. हे सांडपाणी घराच्या समोरच साठून राहत आहे. पाणी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही.
जवळपास दहा महिन्यापासून असे पाणी साठून राहत आहे. यामुळे या भागामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. या कारणाने रोगराईही पसरली आहे. साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होत आहे . तसेच सतत पाणी साचून राहत असल्यामुळे पाण्याचा उग्र वास येत आहे तसेच घरांच्या मुळव्यामध्ये पाणी मुरत असल्यामुळे घरांनाही धोका निर्माण होत आहे. यामुळे जळकोट नगरपंचायतीने तात्काळ या भागामध्ये नालीचे बांधकाम करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी केली आहे. या भागामध्ये नाल्याचे बांधकाम करावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्याकडे करण्यात आली आहे.