24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रजळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप

जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप

सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

मुंबई : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली असून शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या.

मात्र जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मिडियावर व्हीडीओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आहे निवडणूक आयोग?, असा आरोप त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोगात तक्रार करणार
सुषमा अंधारे म्हणाल्या की, जळगावात दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. ही सभा झाल्यानंतर सभेला उपस्थित असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना पैसे वाटत असतानाचा व्हीडीओ मी पोस्ट केलेला आहे. सकाळपासून शिंदे गटाचे नेते सांगत आहेत की, असे काही घडले नाही. सभेला उपस्थित असणा-या अपक्ष उमेदवारांनी हे व्हीडीओ काढले आहेत. याबाबत आणखी व्हीडीओ आहेत आणि मी याची रीतसर निवडणूक आयोगात तक्रार करणार आहे.

शिंदे गटाने आरोप फेटाळले
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या आरोपाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे वागत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सुषमा अंधारे यांचे आरोप फेटाळले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR