हिंगोलीतील घटना, पत्नीचा मृत्यू, दोन चिमुकले गंभीर
हिंगोली : प्रतिनिधी
राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने थेट आपल्या कुटुंबावर बेछूट गोळीबार केला असून, या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला, तर दोन चिमुकल्यांसह आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी हिंगोलीत घडली. या गोळीबाराचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे हिंगोलीत खळबळ उडाली आहे.
राज्य राखीव पोलिस दलाचा जवान विलास मुकाडे याने आज आपल्या कुटुंबावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर दीड वर्षाच्या चिमुकल्यासह सासू आणि आणखी एक जण जखमी झाले असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. तिघांचाही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच यासंबंधीची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, हे अद्याप समोर आले नाही. यासंबंधीचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. आता आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाला आहे. आरोपी सापडल्यानंतरच या गोळीबाराच्या कारणाचा शोध लागू शकेल, असे सांगण्यात आले.