नागपूर : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कॉँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातनिहाय जनगणना, ओबीसींचा सत्तेतील वाटा आणि संविधान बचाव या तीन मुद्यांना हवा दिली. राज्यात येण्यापूर्वीच त्यांच्या स्फोटक विधानाने वातावरण तापले आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये पुन्हा त्यांचा प्रचाराचा रोख काय असेल, याची झलक दाखवली. संविधान सन्मान संमेलनात त्यांनी मोठं वक्तव्य केलं. त्यांनी भाजप विरोधात आरोपांची राळ उडवली.
या संमेलनात राहुल गांधी यांनी महापुरूषांच्या विचाराचे प्रतिबिंब मांडले. आता तुम्ही आंबेडकर आणि गांधींचा विषय काढला. प्रत्येक संमेलनात आंबेडकर आणि गांधींजींचा विचार होतो. शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज, बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, भगवान बुद्धाचे विचार मांडले जातात. त्यांचा उल्लेख होतो. प्रत्येक राज्यात तुम्हाला असे दोन तीन नावे सापडतील. आपण त्यांचं स्मरण करतो. गांधीजी अमर रहे, आंबेडकर अमर रहे म्हणतो, पण वास्तव हे आहे की जेव्हा गांधी आंबेडकरांवर बोलतो तेव्हा व्यक्तीवर बोलत नाही. आपण आंबेडकरांवर बोलायचं झालं तर ते एक फॉर्म होते, एक शरीर होते. पण आंबेडकरांच्या तोंडून केवळ त्यांचा आवाज येत नव्हता. जेव्हा ते बोलायचे तेव्हा कोट्यवधी लोकांचा आवाज त्यांच्या तोंडून यायचा. फक्त आंबेडकरांचा आवाज आला असता तर आपण त्यांची आठवण केली नसती. जेव्हा तुम्ही आंबेडकर वाचता तेव्हा असं दिसतं ही व्यक्ती आपलं म्हणणं मांडत नाही, दुस-यांच्या वेदना मांडत आहेत, असं वाटतं, असे राहुल गांधी यांनी मत व्यक्त केले.
हे संविधान भारतात केवळ काँग्रेस पक्षाने नाही, केवळ नेहरू आणि गांधींनी नव्हे भारताने आंबेडकरांना सांगितलं तुम्ही हे संविधान तयार करा. तेव्हा देश त्यांना सांगत होता. आम्हाला वाटतं या संविधानात जे या देशात कोट्यवधी दलित आहेत. त्यांची वेदना आहे, तो आवाज या संविधानात गुंजला पाहिजे. ते काम आंबेडकरांनी केलं, संविधान सन्मान संमेलनात गांधींनी तत्कालीन परिस्थितीचे आकलन असं केलं.
जे यात सांगितलं तेच बुद्धाने, अशोकाने सांगितलं. सर्वच महापुरुषांनी सांगितलं. तेच आंबेडकर आणि गांधींनी सांगितलं. हे केवळ पुस्तक नाही. ते भारताचं व्हिजन आहे. हे जगण्याची पद्धत आहे. आम्ही जगू तर देशासाठी जगू. एकमेकांचा आदर करू, असे विचार त्यांनी मांडले.