26.4 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रजामनेरमध्ये महाजन विरुद्ध खोडपे 

जामनेरमध्ये महाजन विरुद्ध खोडपे 

जळगाव : जामनेर विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक यंदा रंगतदार होणार याची चिन्हे या प्रचारातून दिसत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी पक्ष संघटित करण्यावर भर दिला आहे.
 जळगाव जिल्हा गेली काही वर्षे भाजपचा बालेकिल्ला आहे. त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आव्हान दिले आहे. शिवसेनेची संगत यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आहे. त्यामुळे जळगावच्या या बालेकिल्ल्यात विधानसभा निवडणुकीत चांगली रंगतदार लढत पाहायला मिळेल, असे सध्याचे चित्र आहे.
 जळगाव जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये ही स्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांनाच यंदाच्या निवडणुकीत काय होईल, याची उत्सुकता आहे. या निमित्ताने भाजपमधील नाराज मंडळी तसेच महाजन यांचे विरोधक सक्रिय झाले आहेत.
 राज्याचे ग्रामविकास मंत्री महाजन हे राज्यातील भाजपचे एक प्रमुख नेते आहेत. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. त्याला दुसरे एक महत्त्वाचे कारण घडले आहे. भाजपचेच व मोठा संपर्क असलेले एक नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी घेऊन महाजन यांना आव्हान देणार आहेत.
ही निवडणूक एक प्रकारे भाजपला भाजपच्या पद्धतीने आव्हान देणारी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यात गेली अनेक वर्षे गिरीश महाजन यांचे निवडणूक तंत्र जवळून अनुभवलेले व त्यांच्याच खांद्याला खांदा लावून लढणारे भाजपच्या पराभवासाठी काम करणार आहेत. त्याचा धसका भाजपने घेतल्याचे जाणवते.
 जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी नुकताच  महाजन यांच्यावर गंभीर आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशाआधी गेली सहा महिने त्यांचा व त्यांच्या समर्थकांचा जामनेर मतदारसंघात बारीक अभ्यास सुरू होता. गेल्या निवडणुकीत देखील खोडपे हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते.
गेल्या निवडणुकीत मात्र ऐनवेळी  महाजन यांनी त्यांची मनधरणी केली. यंदाही खोडपे यांना रोखण्यासाठी भाजपच्या विविध नेत्यांनी विविध प्रयोग केले. मात्र ते यशस्वी होऊ शकलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीतर्फे खोडपे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR