लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा बँकेने शेतक-यांना बिन व्याजी ५ लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्याचे कांही बंकांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांनी परत घेतला. मात्र जिल्हा बँकेने शेतक-यांसाठी एकदा निर्णय घेतला की मग पाऊल मागे नाही. अगदी यांत्रीकरणात जिल्हा बँकेने धाडसाने पाऊल टाकत ऊसतोडणी हार्वेस्टरसाठी १०० जणांना प्रत्येकी १ कोटीपेक्षा अधिक कर्ज दिले. या प्रत्येकांनी एका वर्षात ९० लाखांपर्यंत कामही केले. जिल्हा बँकेने यांत्रीकीकरणासाठी टालेले धाडसाचे पाऊल यशस्वी झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद कापणीसाठी हार्वेस्टर यंत्र घेण्यासाठी पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी पार पडली. त्यावेळी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संचालक श्रीपतराव काकडे, एन. आर. पाटील, पृथ्वीराज सिरसाट, श्रीशल उटगे, किरण जाधव, सर्जेराव मोरे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकारातून जिल्हा बँकेने गेल्या ४० वर्षात प्रगती केली आहे. बँक ही विश्वासावर चालते, तो विश्वास टिकविण्याचे काम संचालक मंडळाने केले आसल्याचे सांगून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले की, आज राज्यात व केंद्रात शेतक-यांची जाणीव नसलेले, मदत न करणारे सरकर आहे. त्यामुळे लोकसभेत तुम्ही धक्का दिला. त्याही पेक्षा येणा-या विधान सभेत लोकसभेत राहिलेला धक्का द्या, त्यामुळे आपल्या विचाराचे सरकार येईल, असे ते म्हणाले.
यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर यांनी ४१ वर्षात जिल्हा बँकेचे वटवृक्षात रुपांतर झाल्याचे सांगत या वटवृक्षाची सावली आपल्या डोक्यावर आहे. शेतक-यांच्या मुलांना सोयाबीन काढणीसाठी हार्वेस्टर देण्याची मागणी केली. या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली. यावेळी बँकेचे संचालक, साखर कारखान्यांचे संचालक, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, शेतकरी आदी उपस्थित होते.
तुमच्या पाठीशी ठाम आहोत
लातूर जिल्हा बँकेत हा कोणत्या पक्षाचा, तो कोणत्या पक्षाचा हे पाहून काम काम करत नसल्याने आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले जिल्हा बँकेने शेतक-यांच्या शेती बरोबरच शिक्षणालाही मदत केल्याचे सांगीते.
बॅक कर्मचा-यांना व गट सचिवांना २५ बोनस
लातूर जिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना २५ टक्के बोनस जाहिर करताना गट सचिवांनाही २५ टक्के बोनस देण्याची घोषणा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केली. तसेच जिल्हयातील सोसायटींच्या १ हजार ५०० चेअरमन यांना अत्याधुनिक मोबाईल देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच शिक्षक पतसंस्थांना १०.५० टक्के दराने पतपुरवठा करण्याचा निर्णय संचलक मंडळाने घेतला असल्याचे राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्हा बँकेच्या ४१ व्या सर्वसाधारण सभेत जाहिर केले.
बदलत्या काळानुसार जिल्हा बँक दमदार पाऊल टाकेल
आज जिल्हा बँक दिमाखाने उभी आहे, याचे सारे श्रेय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना जाते. त्यांच्यामुळे आज सहकाराची भरभराट पाहयला मिळत आहे. वाडवडीलांच्या पुण्याईचे आपण आज फळे चाखत आसल्याचे सांगून आमदार अमित देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा निर्मितीची मागणी करताच मुख्यमंत्री ए. आर. आंतूले यांनी लागलीच होकार दिला. उस्मानाबाद मधून वेगळे होत लातूर जिल्हयाचा विकास लोकनेते विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात झाल्याचे सांगून आमदार अमित देशमुख म्हणाले की, पुणे, मुंबई, रायगड आदी ठिकाणच्या बँकांनी व्यवसायात बदल केले. मात्र लातूर जिल्हा बँक शेती, शेतकरी या पलिकडे गेली नाही. शेतमालावर आधारीत कारखाने उभा राहिले, त्यांना बँकेने कर्ज पुरवठा केला. भविष्याचा वेध घेत लातूर जिल्हा बँक मागे राहणार नाही. वेळीच बदलत्या काळानुसार जिल्हा बँक दमदार पाऊल टाकेल. सोयाबीन शेतीच्या यांत्रीकीकरणाची सुरूवात आपल्या जिल्हयात जिल्हा बँकेच्या माध्यमातून करावी लागेल. अमेरीका, ब्राझील सारख्या देशात यंत्राद्वारे शेतीला १०० टक्के प्राधान्य आहे. १०० शेतक-यांच्या मुलांना हार्वेस्टर देवून शेतक-यांच्या मुलांना नवे उद्योजक तयार केल्याचे सांगून आमदार देशमुख म्हणाले की, आज नांदेड, बीड, धाराशिव जिल्हा बँकेची काय आवस्था आहे, ते पहा, त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, ही बांधीलकी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी गेल्या ४० वर्षात निष्कलंक कारकिर्द जोपासल्याचे आपण पाहत आहोत, असे ते म्हणाले.
यांत्रिकीकरणासाठी शेतक-यांना लातूर जिल्हा बँक मदत करणार
लातूर जिल्हा बँक गेल्या ४१ वर्षात नावारुपाला आली आहे. सुरुवातीला १ कोटी ३१ लाख रूपये भाग भांडवल होते. ११ कोटीच्या ठेवीवरुन ३ हजार ९४५ कोटी रूपयांच्या ठेवी झाल्या. ८ हजार ८ कोटींचा टर्न ओव्हर आज नेतृत्वाला विश्वास दिल्याने झाला आहे. जिल्हा बँकेने सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले. आपणाला इथेच न थांबता लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. गेल्या तीन वर्षात बँकेच्या संचालक मंडळाने चांगले निर्णय घेतले. एखादा निर्णय घेतला की तो पूर्ण केला आहे. यावर्षी सोसायटयांच्या चेअरमन यांनी व्याजासकट मुद्दलाची ९५ टक्के वसूली केल्याचे सांगून चेअरमन आमदार धिरज देशमुख म्हणाले की, कोणत्याही बँकेत खाते काढण्यासाठी किमान १ हजार ५०० रूपये भरावे लागतात. मात्र जिल्हा बँकेने लाडकी बहिन योजनेसाठी शुन्य रूपयांवर ३२ हजार महिलांना खाते उघडून दिले. तसेच आपल्या भागातील शेतकरी लखपती झाला पाहिजे. त्यामुळे जो शेतकरी यांत्रीकीकरणासाठी तयार असेल त्यांना जिल्हा बँक मदत करेल. आता आपली स्पर्धा पश्चिम महाराष्ट्राशी नाही, तर महाराष्ट्र व देशातील बँकांच्या बरोबर सेवा देण्याची आहे. आठ मोबाईल व्हॅनद्वारे बँकेने नागरीकांच्या घरापर्यंक बँकींग सेवा दिली आहे. शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्याचे विलासराव देशमुख साहेबांच्या धोरणानुसार व माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे.
जिल्हा बँक शेतक-यांचे अश्रू पुसण्याचे काम करते
सहकाराचा सहवास वडीलांच्या पासून आहे. लातूर जिल्हा बँकेची वाटचाल एका व्हिजन मधून उत्कर्षाकडे सुरू आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज पेपरवर्क असते. पण जिल्हा बँक शेतक-यांचे आश्रु पुसण्याचे काम करत आहे. जिल्हा बँकेने शुभमंगल, शिक्षण कर्ज, हार्वेस्टरसाठी कर्ज, तसेच ड्रॅगन शेतीसाठी कर्ज देत आहे. मात्र शेतक-यांच्या प्रश्नाकडे सरकार डोळेझाक करत आहे. असे असताना जिल्हा बँक शेतक-यांच्या पाठीशी उभी असे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे म्हणाले.