लातूर : प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षाचा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निव्वळ नफ्याचा तुलनात्मक विचार केला तर विद्यमान आर्थिक वर्षात बँकेच्या निव्वळ नफ्यात लक्षणिय वाढ झालेली दिसून येते. बँकेचा यंदाचा निव्वळ नफा ७३.१५ कोटी रुपये असून ही वाढ नैसर्गीक नसून केलेले योग्य आणि सुक्ष्म नियोजन व त्याची सक्षम अंमलबजावणी याचा हा परिणाम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा बँकांच्या तुलनेत लातूर जिल्हा बँकेने १.४० टक्के नेट प्रॉफिट घेत एक पाऊल पुढे टाकले आहे, असे बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी सांगीतले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात दि. ३० एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत चेअरमन धिरज देशमुख बोलत होते. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. प्रमोद जाधव, संचालक अशोक गोविंदपूरकर, एन. आर. पाटील, मारुती पांडे, अॅड. राजकुमार पाटील, दिलीप पाटील नागराळकर, अनुप शेळके, स्वयंप्रभा पाटील, श्रीमती लक्ष्मीताई भोसले, अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक एच. जे. जाधव, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्च २०२१ ते मार्च २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीतील आर्थिक विश्लेषण मांडताना बँकेचे चेअरमन धिरज देशमुख म्हणाले, विकासरत्न विलासराव देशमुख, स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्र्रेरणेने व ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सहकार्याने बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
बँकेचे भाग भांडवल १८४.१९ कोटी रुपये आहे. बँकेचा ढोबळ नफा ११३.८७ कोटी तर निव्वळ नफा ७३.१५ कोटी आहे. ठेवी, गुंतवणुक, दिलेले कर्ज, खेळते भांडवल, सी.डी. रेशो, प्रती कर्मचारी उलाढाल, प्रती शाखा उलाढाल, ढोबळ एन. पी. ए. प्रमाण, निव्वळ एन. पी. ए. प्रमाणाची माहिती देऊन बँकेचा एकुण व्यवहार ८१३९.३६ कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे सांगीतले. प्रतिकुल नैसर्गीक परिस्थितीत व आवर्षण असतानादेखील सातत्याने सभासद शेतकरी यांनी शेती कर्जाची वसुली दिलेली आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात बँकेची वसुलीची टक्केवारी ८९.०५ एवढी आहे. कर्जमाफी संदर्भातील संभ्रमामुळे वसुलीवर परिणाम झालेला आहे. जुन २०२५ अखेर वसुलीचे प्रमाणात वाढ निश्चित प्रमाणात दिसून येईल, असेही चेअरमन धिरज देशमुख म्हणाले.
लातूर जिल्हा बँकेने सहकारी बँकींग क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत डिजीटल पर्वाची सुरुवात करणारी अग्रगण्य जिल्हा बँक असल्याचे नमुद करुन चेअरमन धिरज देशमुख यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. ऊस तोडणीसाठी हार्वेस्टिंगचा बँकेने प्रायोगीक तत्वावर उपक्रम राबवला. १०० हार्वेस्टिंगचे वितरण झाले. त्यातून सुमारे चार हजार रोजगार उपलब्ध झाले. रेशीम उद्योगासाठी बँकेने शुन्य टक्के दराने कर्ज देताना २ लाख रुपयांवरुन ३ लाख २५ हजारापर्यंत कर्ज मर्यादा वाढवली. नवीन रोजगार निर्मितीचा बँकेचा प्रयत्न आहे.