लातूर : प्रतिनिधी
आपल्या कार्यातून देशभरात लौकिक प्राप्त केलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशस्वी वाटचालीत आजी-माजी कर्मचारी, व गटसचिवांचा मोलाचा वाटा असल्याचे गौरोद्गार बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी काढले लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजी-माजी कर्मचारी व गटसचिवांच्या स्नेहमेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज सिरसाट, राजकुमार पाटील, अनुप शेळके, मारुती पांडे, स्वयंप्रभाताई पाटील, कार्यकारी संचालक एच. जे. जाधव, रेणापुर बाजार समितीचे उपसभापती शेषराव हाके-पाटील, संचालक प्रकाश सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, जिल्हा बँकेचे आजी-माजी अधिकारी, कर्मचारी आणि गटसचिव आदींच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्हा बँकेच्या स्थापनेपासून ते आजच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देणा-या सर्वांच्या कार्याला याप्रसंगी उजाळा देवून कौतुक केले. राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँक वाटचाल करत आहे. आपल्या हक्काची लातूर जिल्हा बँक नेहमीच शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, जिल्हा बँकेने नेहमीच शेतक-यांचा कणा मजबूत करण्याचे कार्य केले आहे. शेतकरी ताठ मानेने चालला पाहिजे, याच विचारातून बँकेचा प्रवास आजही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.
लातूर जिल्हा बँक ही आज राज्याच्या अग्रगण्य बँकांपैकी एक आहे. या यशात बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि गटसचिव या सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कमी मनुष्यबळ असूनही, बँक आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवते आणि पारदर्शक कारभार करते. बँकेने स्वनिधीतून अनेक कल्याणकारी योजना यशस्वीरित्या राबविल्या आहेत, आपल्या हक्काच्या जिल्हा बँकेच्या आगामी वाटचालीतही सर्वांचा मोलाचा सहभाग असेल, असा आशावाद यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
यावेळी आजी माजी कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणारे कर्मचा-यांचा बँकेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.या मेळाव्यास बँकेचे अधिकारी, कर्मचारी, गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामदास देशमुख यांनी केले तर आभार भागवत पौळ यांनी मानले.