लातूर : प्रतिनिधी
मतदार नोंदणीबरोबरच लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी अभिनव उपक्रम राबवले. त्यांच्या कार्याबद्दल राज्याच्या मुख्य निवडणुक अधिका-यांनी राज्यस्तरीय उत्कृष्ट निवडणुक निर्णय अधिकारी पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय मतदारदिनी म्हणजेच दि. २५ जानेवारी रोजी पुणे येथील एमआयटी विद्यापीठात होणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी मतदार नोंदणी अधिकाधिक व्हावी म्हणून विशेष उपक्रम राबवले. स्वीप अंतर्गत युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी नोंदणी शिबिर, वंचित घटकांसाठी मतदार नोंदणी, राष्ट्रीय मतदार नोंदणी दिवस, महारोजगार मेळाव्यांतर्गत मतदार नोंदणी कक्षाची स्थापना केली होती. त्यामुळे ६४.५६० मतदारांची वाढ झाली. मतदार यादीतील स्त्रियांचे प्रमाण दर हजारी पुरुषांमागे ८८८ वरुन ९१६ एवढे वाढले.