लातूर : प्रतिनिधी
उन्हाची प्रचंड तीव्रता त्याततच महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्या यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या खुपच कमी झाली. परिणाती लातूर जिल्ह्यातील नऊ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात दररोज किमान ५० ते ६्र० रक्त पिशव्या लागतात. परंतु, रक्त पिशव्याच शिल्लक नसल्याने आता सर्व मदार ही रिप्लेस डोनवरच असल्याचे दिसून येत आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा भासत आहे. दररोजची रक्ताची मागणी पाहता आवश्यक रक्ताचा येवा नसल्यामुळे सर्वच रक्तपेढ्यांमध्ये अत्यल्प रक्तसाठा आहे. अपघातग्रस्त रुग्ण, प्रसुतीदरम्यान झालेला रक्तस्त्राव, कर्करोग रुग्ण, थॅलेसेमिया रुग्णांना आवश्यतेनूसार रक्ताची गरज भासते, अशा वेळी सदरील रुग्णांना विविध रक्तपेढ्यांतून रक्त घेऊन चढवावे लागते. वेळेवर आणि आवश्यक प्रमाणात लागणारा रक्ताचा पुरवठा झालानाही तर रुग्णांच्या जीवाला धोकाही संभवतो. दरम्यान सद्य:स्थितीत लातूर जिल्हाभरात अपघातग्रस्त रुग्ण, प्रसुतीदरम्यान लागणारा रक्तसाठा आणि विविध शस्त्रक्रिया होणा-या रुग्णांना साधारणत: ५० ते ६० विविध रक्त गटातील रक्ताची मागणी होते. परंतु, त्या तुलनेत रक्ताचे संकलन मात्र केवळ १० ते १५ रक्तपिशव्या एवढेच होत आहे. परिणामी रिप्लेस डोनवरचा अथवा रक्तदान करणा-यांवरच सर्व भीस्त आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सार्वजनिक मोठे उत्सव, कार्यक्रम झालेले नाहीत. तसेच सध्या महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेचेही विविध उपक्रम बंद आहेत. परिणामी रक्तदान शिबिरांची संख्या कमालीची घटली. परिणामी रक्तसंकलन कमी झाले. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असेल तर रक्तपेढीतून संबंधीत रक्तगटाच्या रक्तदात्यास फोन करुन बोलावून घेतले जाते आणि रक्तदान करण्याची विनंती केली जाते. एखाद्या प्रसंगी रक्तदाताच उपलब्ध झाला नाही तर मात्र रिप्लेस डोनरच्या माध्यमातून रक्ताची गरज भागवली जात आहे. आता उन्हाची तिव्रता कमी होत चालली आहे तसेच महाविद्यालयांच्या सुट्याही संपत आल्या आहेत. जुनमध्ये महाविद्यालये सुरु होतील आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणात सुरु होऊन रक्तसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे.