लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यात तीव्र दुष्काळामुळे यंदा रबी हंगाम पूर्णपणे संकटात सापडला आहे. जमिनीतील ओलावा आणि जलस्त्रोतांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील ३.३० लाख हेक्टर क्षेत्रावर रबीच्या पेरण्या झालेल्या नाहीत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात केवळ ५१ टक्के पाऊस पडला. पावसाने दगा दिल्याने भरोश्याचा खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून गेला. सद्यस्थितीत जमितील ओलावा जवळपास संपलाच आहे. शेतजमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. भेगाळलेल्या जमिनीत रबी हंगामसुद्धा शक्य नाही, असे भयाण चित्र सध्या लातूर जिल्ह्यात आहे.
लातूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे आणि इथली शेती ही निसर्गाच्या लहरीपणावर किंवा मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. जेव्हा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी होते आणि जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण होते तेव्हा खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात येतो. अशा कठीण परिस्थितीत शेतक-यांच्या आशा या पूर्णपणे रबी हंगामावर केंद्रित होतात. परंतु, यंदा रबीनेही शेतक-यांची घोर निराशा केली आहे. दुष्काळ हा लातूर जिल्ह्यातील शेतक-यांच्या पाचवीला पुजलेला असला, तरी योग्य पीक नियोजन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि शासनाचे भक्कम पाठबळ मिळाल्यास रबी हंगाम हा शेतक-यांसाठी संजीवनी ठरू असता. संकटावर मात करण्याची जिद्द आणि आधुनिक शेतीची जोड दिल्यास दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातही रब्बी हंगामातून समृद्धी नक्कीच फुलू शकली असती, परंतु, तसे झाले नाही.
















