लातूर : एजाज शेख
निवडणुक आयोगाच्या आदेशानूसार ८० वर्षे पार केलेल्या वृद्ध मतदारांना ‘होम व्होटिंग’ चा अधिकार यंदापासून मिळणार आहे. त्यामुळे वृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आता जाण्याची आवश्यकता राहणार नाही. निवडणुक कार्यालयाचे प्रतिनिधी मतपत्रिका घेऊन वृद्ध मतदारांच्या घरी जाणार आहेत. या सुविधेतचा लाभ लातूर जिल्ह्यातील ७० हजार ५८४ मतदारांना होणार असून हे मतदार घरी बसूनच आता मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
लातूर लोकसभा मतदार संघात १९ लाख ४५ हजार ७७१ एवढे मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार १० लाख २४ हजार ९७५, महिला मतदार ९ लाख २० हजार ७३६, तृतीयपंथीय मतदार ६०, ज्येष्ठ नागरीक मतदार ७० हजार ५८४, १८ ते १९ वर्षातील मतदारांची संख्या २७ हजार ५७८, २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या ३ लाख ८० हजार ९१ एवढी आहे. ८० वर्षांपुढील ७० हजार ५८४ मतदार आहेत. प्रत्येक मतदाराच्या घरी निवडणुक कार्यालयाचे तीन कर्मचारी मतपत्रिका घेऊन मतदान करुन घेणार आहेत. वय वर्षे ८० पूर्ण केलेल्या ज्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाता येणार नाही, अशा वृद्ध मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी निवडणुक कार्यालयाची आहे. अशा वृद्ध मतदारांची माहिती गोळा करण्याचे काम निवडणुक विभागाकडून सुरु आहे. वृद्ध मतदारासोबत दृष्टीहीन व दिव्यंग मतदारांनाही ‘होम व्होटींग’चा अधिकार राहणार आहे. शिवाय गरजू दिव्यंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी शासकीय वाहन मिळणार आहे.