विषारी वायूची गळती, रिसॉर्टमधील घटना
तिबिलिसी : वृत्तसंस्था
जॉर्जियामध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करणा-या ११ भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूची गळती झाल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. जॉर्जियातील भारतीय दूतावासाने यासंबंधी एक निवेदन जारी केले. ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून मृत नागरिकांचे प्रेत भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जॉर्जियातील गुडौरी या परिसरातील एका माऊंटन रिसॉर्टमध्ये ही घटना घडली. यामध्ये एकूण १२ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक नागरिक स्थानिक असून इतर ११ नागरिक भारतीय आहेत.
जॉर्जियाची राजधानी तिबिलिसी येथील भारतीय दूतावासाने ११ भारतीय नागरिकांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. दूतावासाने मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. भारतीय दूतावासाने दूतावास स्थानिक अधिका-यांसोबत काम करत असून मृतदेह लवकरच भारतात पाठवले जातील, असे सांगण्यात आले. रेस्टॉरंटच्या दुस-या मजल्यावर असलेल्या बेडरूमजवळ पॉवर जनरेटर ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासास समोर आली. लाईट गेल्यानंतर या जनरेटरचा वापर करण्यात आला. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड संपूर्ण रुममध्ये पसरला. त्यामुळेच सर्वाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जॉर्जिया पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.