पुणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. खगोलशास्त्रासारख्या गहन विषयात त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. केंब्रिज विद्यापीठातून भारतात आल्यानंतर ‘आयुका’ संस्थेची पुण्यात उभारणी केली. जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या मराठी विज्ञानकथांमुळे लहान मुलांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण झाली. त्यांच्या सहजसोप्या आणि अभ्यासपूर्ण विज्ञानकथांचे गारुड वाचकांच्या तीन पिढ्यांवर कायम आहे.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक जयंत नारळीकर यांचे वडील ‘रँग्लर’ विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. ते वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी तर उच्च शिक्षण ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात झाले. त्यांनी पीएच.डी.बरोबरच पित्याप्रमाणे ‘रँग्लर’ ही पदवी मिळवली. खगोलशास्त्रामधील प्रतिष्ठित असलेले टायसन मेडलवर नाव कोरले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख आणि पुणे येथील ‘आयुका’ संस्थेचे संचालक म्हणून महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळल्या होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाल्याची भावना व्यक्त केली. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात डॉ. नारळीकर यांनी अमूल्य योगदान दिले. गणितज्ञ वडिलांकडून मिळालेला वारसा घेऊन डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला जगभरातील विद्यापीठांनी, संशोधनात्मक संस्थांनी मान्यता दिली. भारतात परतल्यावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स ‘आयुका’ या संस्थेच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. तीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. या संस्थेलाही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र अशी ख्याती मिळवून दिली. ‘बिग-बँग थिअरी’ वर काम करत असतानाच,
त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्षपदही भूषवले. डॉ. जयंत नारळीकर, पुणे या इतक्या पत्त्यावर त्यांच्याकडे लहान-थोरांची शेकडो पत्रं येत. या पत्रांतील विज्ञानविषयक शंका-प्रश्नांचे ते आवर्जून समाधान करत. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी ते अखेरपर्यंत निरलसपणे कार्यरत राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक-भारतीय खगोलशास्त्राचे अध्वर्यू ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठांमध्ये पोहोचून विज्ञान आणि त्यातील गणिती सिद्धांताच्या प्रसारासाठी झटणारा प्रसारक अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्यापकता होती.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे भारतीय वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. नारळीकर यांच्या परिवारावरही आघात झाला आहे. या सर्वांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नारळीकर यांच्या कन्या गिरीजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
नारळीकर यांच्यामुळे राज्याला वैज्ञानिक क्षेत्रात आघाडीचे स्थान
प्रा. नारळीकर हे जागतिक पातळीवर खगोलशास्त्रात आपल्या संशोधनामुळे ओळखले गेले. त्यांचे कार्य भारतासाठी महत्त्वाचे होते. मराठी मातीच्या या सुपुत्राने खगोलशास्त्रात मारलेली झेप निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानाची होती. राज्य शासनाला देखील त्यांनी वेळोवेळी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केले होते. पुण्यात ‘आंतरविश्व विद्यापीठा’ची स्थापना करून राज्यात विज्ञान संशोधनाची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्राला वैज्ञानिक क्षेत्रात आघाडीचे स्थान प्राप्त झाले. त्यांचे निधन हे राज्यासाठी आणि देशासाठी मोठी हानी आहे. नव्या पिढीतील वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ हे निश्चितच डॉ. नारळीकर यांची प्रेरणा घेत राहतील असा मला विश्वास आहे’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोलशास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतच, पण त्याचबरोबर मराठी साहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातली. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही त्यांनी केले. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. भटनागर स्मृति पारितोषिक, एम.पी. बिर्ला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत.