मुझफ्फराबाद : वृत्तसंस्था
सिंधू पाणी करार रद्द करण्याचा भारताच्या निर्णयाने पाकिस्तान हादरला असतानाच आता झेलम खवळल्याने पाकिस्तानमधील अनेक भागात पाणीबाणी झाली आहे. प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली असून स्थानिक प्रसार माध्यमांनी भारतावर आगपाखड सुरू केली आहे.
झेलम नदीला पूर आल्याने मुझफ्फराबाद परिसरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अचानक पाणी सोडल्याने मुझफ्फराबाद परिसरातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली. हट्टियन बाला भागात पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली. नदी काठी राहणा-या लोकांमध्ये दहशत पसरली आहे. हे पाणी भारतातील अनंतनाग आणि पाकिस्तानातील चकोठी भागातून वाहत आहे. मशिदींमधून नागरिकांना बाहेर न पडण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. झेलमचे पाणी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात घुसले आणि पाक व्याप्त काश्मीरमधील चकोठी परिसरात मोठा हाहाकार उडवला. त्यानंतर पुराने पाकिस्तानमधील अनेक भागांना व्यापले.
सिंधू जल करार रद्द केल्याने भारताला नवीन जलयोजना राबवण्यासाठी पाकिस्तानची अनुमती घेण्याची गरज नाही. आता भारत सरकारकडून या पाण्याच्या वापरासंदर्भातही विचार केला जात आहे. सरकार भविष्यात पाण्याचा प्रवाह वळवण्यासह, इतरही संभाव्य पर्यायांवर कायदेशीर आणि तांत्रिक दृष्टीने विचार केला जात आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या लष्कराने गेल्या दोन दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक केली आहे. या भागात सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे. पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ रणगाडे तैनात करण्यात येत आहेत.