पुणे : प्रतिनिधी
काल जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. यातील दोन पर्यटक हे पुण्याचे असून, काही पर्यटक अजूनही तिथेच अडकले आहेत. तसेच, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या कुठलेही राजकारण न करता प्रथम सर्व पर्यटकांना सुरक्षित आणले पाहिजे.
खासदार सुप्रिया सुळे या आज पुणे दौ-यावर आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, काल दिल्ली येथे ‘वन नेशन वन इलेक्शन’ची बैठक चालली होती. त्याचवेळी या घटनेबाबत माहिती मिळाली. आधी अंदाजच येत नव्हता की काय झाले आहे. संध्याकाळपर्यंत माहिती आल्यावर आम्ही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क केला. ही खूप दुर्दैवी घटना असून या घटनेचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे.
अजूनही अनेक लोक अडकलेले असून सर्वजण मदत करत आहेत. त्यामुळे आता टीका-टिप्पणी करण्याची वेळ नसून भारतीय लोक सुरक्षित आहेत, याला प्राधान्य देत जे लोक अडकले आहेत, त्यांना सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि सगळ्यांना ब्रिफिंग करावे तसेच विमानाने परत येण्याची तिकिटं आता तिकडे महागडी झाली आहेत. मी विमान आणि रेल्वे यंत्रणेला फोन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही काही प्रॉफिट कमवायची वेळ नाही. प्रत्येकाला सुखरूप घरी पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.