टेंभुर्णी, –
शहरातील सर्व शासकीय जागेवरील व अंतर्गत सर्व रस्त्यावरील दोन्ही बाजूने केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी मीरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मयूर अजिनाथ काळे यांनी करमाळा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
काळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, टेंभुर्णी शहरात पुणे-सोलापूर महामार्ग, बा वळण रस्ता, अकलूज रस्ता, बेंबळे रोड, औद्योगिक वसाहत रोड, सुर्ली रोडवर अनेक लोकांनी टपरी टाकून, बांधकाम करून, विजेचे पोल, डिजिटल बॅनर, अवैध वाहतूक करणारी वाहने, दुकानातील साहित्य, हातगाडी, दुकानाचे साहित्य अशा पद्धतीने अतिक्रमण केलेले आहे. यामुळे अपघात होत असून वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे अतिक्रमण काढावे तसेच अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. उपोषणात किशोर देशमुख, अभिषेक गायकवाड, सौरभ शेंडे, महेश देशमुख सहभागी झाले असून शिंदे गट शिवसेनेचे संजय कोकाटे, अॅड. प्रशांत देशमुख, शेतकरी संघटनेचे प्रशांत पाटील, पोपट अनपट यांनी भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.