30.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयट्रम्पविरोधात २७ देशांनी उगारली वज्रमूठ!

ट्रम्पविरोधात २७ देशांनी उगारली वज्रमूठ!

रेसिप्रोकल टॅरिफ । टेरिफ वॉरचा भडका उडणार; अमेरिकेची २८ अब्ज डॉलरची निर्यात अनिश्चिततेच्या गर्तेत

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या समतुल्य आयात कराला (रिसिप्रोकल टॅरिफ) उत्तर म्हणून २७ देशांचा युरोपीय संघही (ईयू) आता अमेरिकी वस्तूंवर आयात कर लावण्याच्या तयारीत आहे. यामुळे अमेरिकेची २८ अब्ज डॉलरची निर्यात अनिश्चिततेच्या छायेखाली आली आहे.

अमेरिकेच्या आयात करास उत्तर म्हणून चीनने अमेरिकी वस्तूंवर आधीच ३४ टक्के अतिरिक्त कर लावला आहे. कॅनडानेही प्रतिकारवाई करीत अमेरिकी वस्तूंवर २५ टक्के कर लावला आहे. त्यामुळे सोमवारी जगभरातील बाजारांनी आपटी खाल्ली आहे. त्यातच ईयूच्या संभाव्य कारवाईचे वृत्त आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

अमेरिकेतून आयात होणा-या डेंटल फ्लॉसपासून हि-यापर्यंतच्या अनेक वस्तूंवर ईयूकडून अतिरिक्त कर लावला जाऊ शकतो. याच्या पहिल्या संचास मंजुरी देण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकेच्या कोणत्या वस्तूंवर प्रत्युत्तरादाखल कर लावायचे याचा निर्णय युरोपीय कमिशन घेत आहे. यात मांस, अन्नधान्ये, मद्य, लाकूड, कपडे, च्युइंग गम, डेंटल फ्लॉस, व्हॅक्युम क्लिनर आणि टॉयलेट पेपर यांचा समावेश केला जाऊ शकतो. सर्वाधिक चर्चेतील बोरबॉनही संभाव्य कराच्या यादीत असल्याची माहिती आहे.

युरोपियन युनियन ही अमेरिकेचे सर्वात महत्त्वाच्या व्यापार भागीदारांपैकी एक आहे. अमेरिका ही युरोपियन वस्तूंसाठी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या टॅरिफला प्रत्युत्तर देणे हे एक वेदनादायक कार्य ठरू शकते. तसेच युरोपियन कंपन्यांसाठी खर्चिक ठरु शकते. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून नेमक्या उत्पादनांवर किती टॅरिफ आकारण्यात यावा यावर विचार केला जाणार आहे. सदस्य देशांकडून याबाबत अभिप्राय मागवले जाणार आहेत. त्यानंतरच उत्पादनांची यादी निश्चित केली जाणार आहे.

चीनने डोळे वटारले
अमेरिकेच्या टॅरिफ ब्लॅकमेलला घाबरणार नाही असं म्हणत चीनने डोळे वटारले आहेत. आमच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा उलट इशाराही चीनने अमेरिकेला दिला आहे. चीन-अमेरिकेतल्या तणावामुळे चीनने भारताशी संबंध सुधारण्यावर भर दिला. अमेरिकेनं लावलेले 34 टक्के आयात शुल्क टाळण्यासाठी चीननं भारतीय बाजारपेठेकडे लक्ष वळवलं आहे. भारतातून चीनमध्ये आयात वाढवण्याचं चीनच्या सरकारने लक्ष ठेवले आहे. भारतातील चीनचे राजदूत शू फेंग यांच्याकडून व्यापार वाढवण्याबाबत भाष्य करण्यात आले.

५० टक्के टॅरिफ निश्चित?
युरोपीय कमिशनने अमेरिकी वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ निश्चित केल्याची माहिती आहे. मात्र, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय संघास या मुद्यावरून धमकावले आहे. युरोपीय संघाने टॅरिफ लावल्यास संघाच्या अल्कोहोलिक ड्रिंकवर २०० टक्के काउंटर टॅरिफ लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR