16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाच्या साळवेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ठाकरे गटाच्या साळवेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश साळवे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत मुंबईत शुक्रवारी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. साळवे यांच्या पक्षप्रवेशाने महाविकास आघाडीत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत साळवे हे पुणे कँटोन्मेंटमधून उमेदवार ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

साळवे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. त्यांच्या पक्षप्रवेशाला फाटे फुटू नयेत, यासाठी काँग्रेसमधील एका गटाने पूर्ण काळजी घेतली. मुंबईत चेन्निथला यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतरच ही वार्ता राजकीय वर्तुळात पसरली. पुणे कँटोन्मेंटमधून उमेदवारीचे दावेदार समजले जाणारे माजी मंत्री रमेश बागवे यांचा पत्ता कापला जाणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर खासदार झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे बागवे हे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात बागवे गृहराज्यमंत्री होते. मात्र, चव्हाण यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतरही बागवे काँग्रेसबरोबरच एकनिष्ठ राहिले.

त्यामुळे कँटोन्मेंटमधून त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे समर्थकांचे म्हणणे आहे, तर गत दोन निवडणुकांमध्ये बागवे यांचा पराभव झाल्याने काँग्रेसकडून नव्या चेह-याचा शोध सुरू होता आणि तो साळवे यांच्या रूपाने पूर्ण झाल्याचे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर साळवे यांचा काँग्रेस प्रवेश हा पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR