गणेशोत्सवातील ‘डीजे’चा वाढता दणदणाट, कानठळ्या बसवणारा आवाज आणि लेझर किरणांच्या अतिवापरामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणा-या अस त्रासाविरोधात पुण्यात रविवारी उत्स्फूर्त जनआक्रोश दिसून आला. पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत डीजेविरोधात धाडसी आणि रोखठोक भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्या समर्थनासाठी हजारो पुणेकर बालगंधर्व चौकामध्ये जमले आणि तेथून पुणे महानगरपालिकेपर्यंत एक विराट मोर्चा काढण्यात आला. ‘नागपुरात कायद्याला मान, सोलापूरला परंपरेचे भान, मग पुण्यातच लाऊडस्पीकरला का मोकळे रान?’ अशा तीव्र घोषणा देत पुणेकरांनी आपला संताप व्यक्त केला. ‘पुणेकर अगेन्स्ट लाऊडस्पीकर’ मंचाच्या वतीने या भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा कोणत्याही राजकीय दबावाशिवाय केवळ पुणेकरांच्या मनातील खदखद आणि त्रासामुळे अत्यंत उत्स्फूूर्तपणे रस्त्यावर उतरला होता.
या आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार, निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, डॉक्टर, पर्यावरणप्रेमी आणि तरुण वर्ग (जेन झी) सहभागी झाला होता. पुण्यात गणेशोत्सव आणि मिरवणुका नक्कीच झाल्या पाहिजेत; परंतु गत दोन दशकात या उत्सवाला अत्यंत बटबटीत स्वरूप प्राप्त झाले असून केवळ लायटिंग, कर्णकर्क्कश आवाज आणि प्रचंड गोंगाट उरला आहे. या अति गर्दीमुळे लोकांना वेळेत उपचार न मिळाल्याने आणि डीजेच्या धक्क्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आपल्या शहराचे आणि मुलाबाळांचे भविष्य निरोगी राहावे यासाठी सामान्य पुणेकरांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. रस्ते हे प्रामुख्याने वाहतुकीसाठी आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणारे वर्षभरातील सर्व उत्सव, मिरवणुका आणि जयंत्या रस्त्यावरून हटवून मोकळ्या मैदानामध्ये आयोजित केल्या पाहिजेत ज्यामुळे उर्वरित समाजाला कोणताही उपद्रव होणार नाही. ‘डीजे’च्या आवाजामुळे हृदय धडधडते, कानाला त्रास होतो, मुले शाळेत जाऊ शकत नाहीत आणि लोक दुकाने उघडू शकत नाहीत. आवाजामुळे रक्तदाब वाढतो आणि प्रचंड त्रास होतो. मोबाईल अॅप्सवर दाखवला जाणारा डेसिबलचा आकडा पूर्णपणे खोटा असतो. कारण लाऊडस्पीकर नसतानाही आजूबाजूचा नेहमीचा आवाज ९० डेसिबलच्या आसपास असतो.
६० डेसिबलचा नियम लाऊडस्पीकर सुरू असताना पाळला जाणे कधीही शक्य नसते. पुण्यातील मोर्चामध्ये जेन झी आणि ‘मिलेनियल्स’ पिढीचा उत्स्फूर्त सहभाग होता. या तरुणांनी ‘डीजे’ बंदीची मागणी केली. डीजेच्या आवाजामुळे लोकांमध्ये नैराश्य आणि तीव्र चिंता वाढून मानसिक अस्वस्थता निर्माण होते. पुण्यात अशी स्थिती आहे की, गणेशोत्सव जवळ आला की घरच्यांच्या अंगावर काटा येतो. घरात वृद्ध आजी-आजोबा असल्याने त्यांना एकटे सोडून बाहेर जाता येत नाही. आवाजाच्या तीव्रतेने घरातील काचा थरथरतात. तरुणांनी अशा चुकीच्या गोष्टींना ‘संस्कृती किंवा धर्मविरोधी’ ठरवणा-या नरेटिव्हवर आक्षेप घेतला आहे. डीजेला विरोध म्हणजे संस्कृतीला किंवा सणाला विरोध नव्हे. पुण्यामध्ये सध्या ‘मेट्रो’च्या कामामुळे रस्ते आधीच अरुंद झाले असून त्यात ठिकठिकाणी उभारलेले मंडप आणि ढोल-ताशांच्या वादनामुळे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते त्यावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कमीत कमी ध्वनीप्रदूषण करून उत्सव साजरे केले पाहिजेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कमीत कमी म्हणजे किती डेसिबल्स हे त्यांनी सांगितले नाही. ऐन उत्सवात अशी ध्वनीप्रदूषण पातळी तपासणार कोण? सगळ्यांनी एकाच वेळी कितीही कमी ध्वनीप्रदूषण केले तरी व्हायचा तोच परिणाम होणार. पारंपारिक पद्धतीने म्हणजे त्यात ढोल-ताशा पथकेही गृहीत धरली असतील तर त्यामुळेही मोठे ध्वनीप्रदूषण होतेच. आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये अनेक पथके एकत्र येतात तेव्हा अक्षरश: घर थरथरल्यासारखे जाणवते, असा अनेकांचा अनुभव आहे. धर्मपालनाचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने सर्वांना दिले आहे; पण या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना भान हरपले तर जीवित, आर्थिक आणि पर्यावरणीय हानी होते. गणेशोत्सवात बुद्धीलाच सोडचिठ्ठी दिली जात आहे. वरचढ होण्याच्या स्पर्धेत सण धूमधडाक्यात साजरे होऊ लागले अन् मूळ उद्देशच बाजूला फेकला गेला, असेच चित्र दिसते आहे. बापटांचा प्रतिवाद करणा-यांकडे मुद्दे नसल्याने त्यांना गुद्यांवर उतरावे लागले, हा त्यांचा पराभव आहे.
















