31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रडॉ. शिरीष वळसंगकर यांना अखेरचा निरोप

डॉ. शिरीष वळसंगकर यांना अखेरचा निरोप

कर्मचा-यांना शोक अनावर, हजारो सोलापूरकरांनी घेतले अंत्यदर्शन

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवार, दि. १८ एप्रिल रोजी डोक्यात गोळी झाडून घेऊन आपले जीवन संपवले. शनिवारी दि. १९ एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी गेल्या २५ वर्षांपासून सोलापूर शहर, जिल्हा, आजूबाजूच्या जिल्ह्यातील तसेच देश-विदेशातील रुग्णांच्या मेंदूविषयी आजारांवर यशस्वी उपचार केले. विशेषत: रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात त्यांच्यासारखा हुशार न्यूरोसर्जन नव्हता. मात्र, रुग्णांच्या मदतीला धावणारा हा दीपस्तंभ शुक्रवारी अनपेक्षित प्रकारे लोकांच्या काळजाला चटका देऊन गेला. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याची उलटसुलट चर्चा शनिवारी दिवसभर सोलापूरकरांमध्ये सुरू होती.

शनिवारी शवविच्छेदनानंतर डॉ. वळसंगकर यांचे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी रुग्णालयातील कर्मचारी, स्रेही डॉक्टर यांच्यासह त्यांनी बरे केलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी गर्दी केली होती. आपल्या समस्या मिटवून आपल्याला जीवनाची आशा दाखवणा-या या रुग्णस्रेही डॉक्टरांनी असे जीवन का संपवले, हा प्रश्न प्रत्येकाच्या चेह-यावर दिसून येत होता. मात्र आपल्या तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवत सर्व लोक त्यांचे अंत्यदर्शन घेत होते. काही जणांना आपला हुंदका आवरता येत नव्हता. दिवसभरात हजारो सोलापूरकरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर डॉ. शिरीष वळसंगकर यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून हिंदू स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथे त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. त्यानंतर विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीत डॉ. शिरीष वळसंगकर अनंतात विलीन झाले. अंत्यविधीसाठी सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचारी, राजकीय नेत्यांसह हजारो सोलापूरकर उपस्थित होते.

सुसाईड नोट सापडली नाही : पोलिस आयुक्त
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी बाथरूममध्ये आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसते. आत्महत्या केलेल्या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यांच्या कुटुंबियांशीही अद्याप काही बोलणे झाले नाही. पुढील माहिती त्यांच्याकडून घेणार असून सदर बाजार पोलीस स्टेशन तपास करत आहे, असे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR