लातूर : प्रतिनिधी
येथील नेटीझन्स फाऊंडेशन स्कूलच्या ३८ विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघाद्वारे घेतल्या जाणा-या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवत घवघवीत यश मिळवले आहे. शाळेचे ६ वी मधून १६ विद्यार्थी व ९ मधून २२ असे एकूण ३८ विद्यार्थ्यांची निवड झाली.
हे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेच्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. ही परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुचि वाढविणे, तर्कशक्ती, सखोल अध्ययन, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती व आकलन क्षमता विकसित करण्यासाठी घेतली जाते. नेटीझन्स फाऊंडेशन स्कूलमधील उत्कृष्ट तयारी व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे, असे मत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी प्राचार्य सुधाकर तोडकर यांनी व्यक्त केले. ६ वी वर्गातून सोहम विलास शिंदे आणि ९ वी वर्गातून श्लोक संदीप शास्त्री हे विद्यार्थी गुणानुक्रमे पहिले आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशासाठी शाळेमध्ये विशेष तयारी वर्ग व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळेतील शिक्षिका प्रियंका काकनाटे, वैष्णवी तेलंगे, मोहिनी बेडगे, उग्रसेन चटप, हेमंत श्रीवास्तव, पठाण, रणजीत सोमवंशी, सुरज मस्के पाटील, धनाजी शिंदे सर, मुडबे, संतोषी कहाळेकर यांनी विशेष मेहनत घेतली. यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थापक प्राचार्य एस. जे. तोडकर, संस्थेच्या अध्यक्षा चंद्रकला तोडकर, सचिव मीनाक्षी तोडकर, कोषाध्यक्ष महेश तोडकर, उपप्राचार्य एम. ए. पठाण, समन्वयक बी. एम. मुंडे, सहायक संचालक नितीन सदाफुले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.