इंदौर : वृत्तसंस्था
राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशात ख-या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी संविधानाचा अपमान केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राहुल गांधी बोलत होते.
मला वाटते की संघ प्रमुखांनी १९४७ मध्ये भारताला कधीच स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे हे अगदी प्रतीकात्मक आहे. ते म्हणाले की, खरे स्वातंत्र्य राम मंदिर बांधले तेव्हाच मिळाले. मोहन भागवत यांनी संविधान आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक नसल्याचे सांगतानाच त्यावर हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य चळवळ आणि राज्यघटनेबद्दल आपले मत राष्ट्राला सांगण्याची हिंमत केली. ते जे बोलले ते देशद्रोह आहे कारण ते म्हणाले आमची राज्यघटना अवैध आहे. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. आणि आपण हे ऐकणे बंद केले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
काय म्हणाले मोहन भागवत?
इंदौर येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना ‘राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार’ प्रदान केल्यानंतर एका कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, जो शतकानुशतके बा आक्रमण सहन करणा-या भारताच्या ख-या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली. देश स्वत:च्या पायावर उभा राहावा आणि जगाला रस्ता दाखवता यावा यासाठी भारताने स्वत:ला जागृत करण्यासाठी राम मंदिर आंदोलन सुरू केले होते. कोणाचा विरोध करण्यासाठी राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केलेली नाही, असे मोहन भागवत म्हणाले.