विरार : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी आज (१९ नोव्हेंबर) बहुजन विकास आघाडीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस जनतेला पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. तावडे पाच कोटी घेऊन विरारमधील विवांत हॉटेलमध्ये पोहोचल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. ही बाब बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनीही हॉटेल गाठले. यानंतर हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. सध्या विनोद तावडे हॉटेलमध्येच आहेत. त्याचा बीव्हीए कार्यकर्त्यांसोबत अजूनही वाद सुरू आहे.
विनोद तावडे असलेल्या नालासोपा-यातील विवांत हॉटेलमधील केवळ रूम नंबर ४०७ मध्ये नऊ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक रूमची पंचनामा करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. एकूण पाच कोटी रुपये आणले असल्याच्या दावा करण्यात येत आहे. हॉटेलमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी घेरल्याने विनोद तावडे यांना बाहेर पडणे अडचणीचे झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कर्मचा-यांना कारवाई करणे भाग पडले.
दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे आणि नालासोपारा भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. विनोद तावडे यांच्या वाहनाची चौकशी करण्याची मागणी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विरोधक भाजपला कोंडीत पकडण्यात व्यस्त आहेत.