औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील तावशीताड शिवारात पेरणीपूर्व मशागत करत असलेल्या एका शेतकरी मजूराचा अंगावर विज पडून होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि. १६ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. दिनकर किसन माने (वय ६१) रा. कानेगाव (ता. लोहारा जिल्हा धाराशिव ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
माने हे पत्नीच्या निधनानंतर गेल्या दहा वर्षांपासून तावशीताड येथे असलेल्या आपल्या बहिणीकडे राहत होते. ते दैनंदिन कामाप्रमाणे तावशीताड येथील शिवारात असलेल्या देशपांडे यांच्या शेतात गेले असता दुपारी तीनच्या दरम्यान शेतात कुळव मारत असताना अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बिटअंमलदार मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास बीट अंमलदार ए. बी. शिंदे हे करीत आहेत. माने यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.