पुणे : शहरातील नवचैतन्य महिला मंडळ, पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांच्या ११२ कंट्रोल रूमवर सोमवारी (ता. १९) रात्री नऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. त्यानंतर पुणे पोलिस अलर्ट झाले असून याचा तपास सुरू आहे.
अज्ञात व्यक्तीने दिलेल्या धमकीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या अधिका-यांसह सीआरपीएफ, रेल्वे पोलिस आणि पुणे पोलिसांच्या पथकांनी एकत्रितपणे संदिग्ध भागात कसून तपास केला. मात्र, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
सध्या पुणे पोलिसांकडून धमकी खोटी होती की खरी? याचा तपास सुरू आहे. कॉल करणा-याची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला जात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये हा उल्हासनगरमधील महिलेचा खोडसाळपणा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सध्या देशातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चौकशी सुरू ठेवली आहे. विविध बाजूने या कॉलचा तपास पोलिसांकडून घेण्यात येत आहे.