कोस्टा रिका : वृत्तसंस्था
कोस्टा रिका येथील पोकोसी कारागृहातील अधिका-यांनी एका मांजरीला तिच्या शरीरावर ड्रग्जची दोन पाकीट घेऊन जाताना पकडले आहे. मांजरीकडे २३५.६५ ग्रॅम गांजा आणि ६७.७६ ग्रॅम हेरॉइन असलेले पॅकेज होते, असे अधिका-यांनी सांगितले. ती जप्त करण्यात आली आहेत आणि मांजरीला आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय प्राणी आरोग्य सेवेकडे सोपवण्यात आले आहे.
मध्य अमेरिकन देशांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी ही एक मोठी समस्या आहे. येथे तस्करीही होते आणि त्यासाठी कडक कायदे ही आहेत. मेक्सिकोचे ड्रग कार्टेल जगभर प्रसिद्ध आहेत. त्याचवेळी, कोस्टा रिकामध्ये ड्रग्ज तस्करी बेकायदेशीरपणे होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांपासून तेथे तस्करीसाठी प्राण्यांचा वापर केला जात आहे. अलिकडेच, पोकोसी पेनिटेंशियरी येथील तुरुंग रक्षकांनी एका मांजरीला तिच्या शरीरावर ड्रग्ज चिकटवलेल्या अवस्थेत पकडले. या विचित्र प्रकरणामुळे लोकांना धक्का बसला आहे.
नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटनासाठी ओळखले जाणारे कोस्टा रिका आता या विचित्र गुन्ह्यामुळे चर्चेत आहे. कोस्टा रिका येथील न्याय मंत्रालयाच्या फेसबुक पोस्टनुसार, तुरुंगाच्या काटेरी तारांच्या कुंपणाजवळ सुरक्षा रक्षकांना एक काळी-पांढरी मांजर विचित्रपणे वागत असल्याचे लक्षात आले. त्यांनी मांजराला पकडले तेव्हा तिच्या अंगावर गांजा आणि कोकेनचे दोन पाकिटे घट्ट बांधलेली होती.