अश्विनी पौर्णिमेनिमित्त सोलापूर-तुळजापूर, नळदुर्ग-तुळजापूर मार्गावर भाविकांची गर्दी
तुळजापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पौर्णिमा उत्सवानिमित्त तुळजापूर नगरीत भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक पायी वारी करीत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. सोलापूर-तुळजापूर तसेच नळदुर्ग-तुळजापूर मार्गावर भाविकांची मोठी गर्दी झाली असून, रस्त्यांवर पायी चालणा-या भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.
हातात भगवे ध्वज, मुखी आई तुळजाभवानीचा जयघोष आणि मनात देवीवरील अपार श्रद्धा घेऊन भाविक पायी वारी करीत आहेत. अनेक किलोमीटरचा प्रवास करून भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये दाखल होत आहेत. भाविकांच्या गदीर्मुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
तुळजापूरकडे पायी येणा-या भाविकांच्या सेवेसाठी सोलापूर-तुळजापूर आणि नळदुर्ग-तुळजापूर मार्गावर ठिकठिकाणी अन्नक्षेत्रे सुरू करण्यात आली आहेत. या अन्नक्षेत्रांच्या माध्यमातून भाविकांना भोजन देऊन अन्नदानाची सेवा केली जात आहे. विविध मंडळे, संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून भाविकांची सेवा करण्यात येत असून, या सेवेमुळे पायी येणा-या भाविकांना दिलासा मिळत आहे. अश्विनी पौर्णिमेनिमित्त पायी येणा-या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन सोलापूर-तुळजापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी आणखी भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुळजापूर नगरीत उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, आई तुळजाभवानीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून जात आहे. पायी वारी करणारे भाविक, ठिकठिकाणी सुरू असलेली अन्नदान सेवा आणि भगव्या ध्वजांनी सजलेले रस्ते यामुळे तुळजाभवानीच्या भक्तीचा जागर सर्वत्र पाहायला मिळत आहे.
















