21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरतुळजापुरातून ज्योत घेऊन जाताना भाविकांच्या गाडीचा अपघात; २ ठार, ६ जखमी

तुळजापुरातून ज्योत घेऊन जाताना भाविकांच्या गाडीचा अपघात; २ ठार, ६ जखमी

पोखरापूर : नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून ज्योत घेऊन गावाकडे जाणा-या भाविकांच्या पिकअपचा सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाल्याने दोघेजण ठार झाले, तर सहा जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील कामती येथे घडला. प्रदीप सुरेश क्षीरसागर (वय २०) आणि नेताजी अंकुश कराळे (वय २३) (दोघेही रा. गोणेवाडी, ता. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.

कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील पिकअप श्रीक्षेत्र तुळजापूर येथे ज्योत आणण्यासाठी गेली होती. त्यामध्ये अनेक तरुण होते. गुरुवारी सकाळी ज्योत घेऊन परत गावाकडे जात असताना सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर कामती खुर्द गावच्या हद्दीत पिकअप कठड्यावरून पलटी होऊन सिमेंटच्या गटारीत पडली. त्यामध्ये प्रदीप क्षीरसागर व नेताजी करळे या दोघांना गभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले.

रोहित अशोक माने (वय १४), रोहित दिलीप कसबे (वय २०), समाधान मोहन मासाळ (वय २९), सोहेल राजू मुलानी (वय ३२), महेश भारत बंडगर (वय १७) (पाचही जण रा. गोणेवाडी, ता. मंगळवेढा) आणि वैभव अर्जुन हजारे (वय २४, रा. वाडेगाव, ता. सांगोला) हे जखमी आहेत. त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कामती पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळच्या शासकीय रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर गोणेवाडी गावावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोलापूरच्या दिशेने धाव घेतली. या अपघाताचा तपास कामती पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR