लातूर : प्रतिनिधी
केवळ तोंडी आदेशाने धाराशिव जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचे जी. पी. एफ. बंद केल्याने शिक्षकांचे आयुष्य अंधकारमय झाले आहे. या अनुषंगाने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दि. १५ एप्रिल रोजी धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांनी लातूर शहरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
संपुर्ण महाराष्ट्रातील व लातूर विभागातील नांदेड, लातूर जिल्ह्यांतील १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचा-यांचे आजपर्यंत नियमित जी. पी. एफ. कपात सुरु आहे. परंतू, धाराशिव या एकमेव जिल्ह्यातील कर्मचा-यांचे जी. पी. एफ. कपात बंद आहे. या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात कर्मचा-यांच्या मनातील तिव्र असंतोष यापुर्वी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. तरीही शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व कर्मचा-यांनी दि. १५ एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर लाक्षणीक धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाला शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य अंशत: (२००५ पुर्वी) अनुदान प्राप्त संघटना, मराठवाडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ, शिक्षक भारती संघटना या संघटनांनी पाठिंबा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक, कर्मचारी यांच्या मागणीचा विचार करुन जी. पी. एफ. कपात सुरु करण्याबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा धाराशिव व संबंधीत वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयास त्वरीत आदेश द्यावेत, अशी मागणी आंदोलक शिक्षक कर्मचा-यांनी केली आहे.