देवघर (झारखंड) : वृत्तसंस्था
देशभरात लग्नसराई सुरु आहे. मात्र या कडाक्याच्या थंडीमुळे नवरदेव बेशुद्ध पडल्याने वधूने लग्न मोडले आहे. त्यामुळे तरुणाला रिकाम्या हाताने वरात घेऊन माघारी फिरावे लागले.
झारखंडच्या जगप्रसिद्ध द्वादश ज्योतिर्लिंग बाबा बैद्यनाथ धाममध्ये अनेक विवाह होतात जे चर्चेचा विषय बनतात. मात्र देवघर जिल्ह्यातील मोहनपूर परिसरात असलेल्या घोरमारा येथे कडाक्याच्या थंडीच्या लाटेत लग्न करणे एका तरुणाला महागात पडले. थंडीमुळे या तरुणाचे लग्न होण्याआधीच तुटले. अर्णव नावाच्या मुलाचे लग्न अंकिता नावाच्या मुलीशी होणार होते. दोन्ही पक्षांच्या संमतीने हा विवाह एका खासगी गार्डन कॅम्पसमध्ये होत होता. थंडी असूनही सर्व काही उत्साहात सुरु होते. लग्नाआधीचे सर्व विधी वेळेत पूर्णही झाले होते.
जेवणानंतर वधू-वरही मंडपात आले. त्यानंतर भटजींनी विवाह विधी सुरू केला. दरम्यान, अचानक नवरदेव बेशुद्ध पडला. नवरदेवाचे अंग थंड झाले होते. घरच्यांनी घाईघाईने नवरदेवाला खोलीत नेले आणि त्याचे हातपाय चोळायला सुरुवात केली.
त्यानंतर जवळच्या डॉक्टरांना बोलावून आणण्यात आले. थंडी कमी होण्यासाठी नवरदेवाला सलाईन आणि इंजेक्शन दिले. सुमारे एक ते दीड तासानंतर नवरदेवाची प्रकृती सामान्य झाली. त्यामुळे तो पुन्हा मंडपात बसण्यास तयार झाला. मात्र वधूने फेरे घेण्यास स्पष्ट नकार दिला.