24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रथोपटे, कोल्हेंचा कारखान्यांना मदतीच्या यादीतून वगळले?

थोपटे, कोल्हेंचा कारखान्यांना मदतीच्या यादीतून वगळले?

राज्य सरकारच्या हालचाली
मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून मदत देण्यात येणा-या राज्यातील अडचणीतील कारखान्यांच्या यादीतून विरोधी पक्षांच्या दोन कारखान्यांना वगळण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. त्यामध्ये काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि अहमदनगरमधील विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही नेत्यांच्या कारखान्यांना मार्जिन मनी लोन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, लोकसभेनंतर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर या दोन्ही कारखान्यांना वगळण्यात येत असल्याची माहिती आहे.

राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या एनसीडीसीमार्फत १८९८ कोटी मार्जिन लोन मंजूर करण्यात आले होते. मात्र, या १३ साखर कारखान्यांमधून काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचा राजगड साखर कारखाना तर कोपरगावमधील विवेक कोल्हे यांचा साखर कारखाना वगळण्याची हालचाल सुरु झाल्याची माहिती आहे. ही दोन्हीही साखर कारखाने वगळण्याच्या मागे दोन्ही जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा दबाव असल्याची सूत्रांची माहिती आहे.

काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला ८० कोटी रुपये तर शंकराव कोल्हे कोपरगाव सहकारी साखर कारखान्याला १२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र राजकीयदृष्ट्या समीकरण बदलल्यानंतर या दोन्ही कारखान्यांना मदत दिली जाणार नाही.

विरोधी कारखान्यांना
मदत करावी : पवार
राज्यातील सत्ताधा-यांशी संबंधित कारखान्यांना मदत दिली जाते, पण विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या कारखान्यांना मदत दिली जात नाही, असा सहकार क्षेत्रातून तक्रारीचा सूर आहे. याच मुद्यावरती शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व कारखान्यांना मदत करण्याची विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, या दोन कारखान्यांना मदत देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या इतर चार कारखान्यांना मदत दिली जाणार आहे. संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांच्या कारखान्याव्यतिरिक्त कोणत्या कारखान्यांना मदत करण्यात येणार आहे, हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR