39.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रदंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र

दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र

राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज

नागपूर : प्रतिनिधी
दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज आहे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नागपूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या सद्भावना शांती मार्चवेळी व्यक्त केले. नागपूर शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. आजच्या पदयात्रेत दीक्षाभूमी, ताजुद्दीन बाबा व टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले. या मोर्चात प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते पण पोलिस फोन उचलत नव्हते असे भाजपा आमदार सांगत होते, यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे. उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत. आपल्याला एकजूटतेने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे. संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. सत्तेसाठी काही लोक भावाभावांत, जातीपातीत भांडणे लावत आहेत. सत्तेसाठी अशांतता पसरवणा-यांनी जाती-धर्मात, भावाभावात भांडणे लावू नयेत, असे आवाहन सपकाळ यांनी केले.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पुरोगामी विचाराने चालणा-या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले. संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जाती-धर्माच्या नावाने वाद निर्माण करत आहेत. एक मंत्री मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतो पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत. नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले त्याप्रकरणी अधिका-यांना आता माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारचा नपुंसक सरकार असा उल्लेख केला हे लाजीरवाणे आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR