नृसिंहवाडी : प्रतिनिधी
‘दिगंबरा… दिगंबरा’च्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज, शनिवारी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दत्तदर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून लाखो भाविक आले होते. भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थान मार्फत अनेक सोयी व सुविधा पुरविण्यात आल्या. मंदिर परिसरात ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही.ची व्यवस्था, दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था, तसेच मुखदर्शन, महाप्रसाद, जन्मकाळानंतर सुंठवडा प्रसाद वाटप, नदीच्या काठी इनरट्यूबची व्यवस्था करण्यात आली होती. एसटी महामंडळामार्फत सुमारे १०० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.