बीड : प्रतिनिधी
राज्यामध्ये बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपरहण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पावणे तीनशे कोटींचा घोटाळ्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केला आहे. यावरून आता धनंजय मुंडे यांनी देखील आक्रमक होत दमानियांविरोधात फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी राज्याच्या कृषी खात्यातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. महायुती सरकारमध्ये तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांची मालिकाच सुरू होती, असा आरोप करत दमानिया यांनी थेट कागदपत्रेच माध्यमांसमोर सादर केली. एकामागून एक घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवत त्यांनी कृषी खात्यातील घोटाळे समोर आणले. तसेच आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही, असा सवालही उपस्थित केला.
अंजली दमानिया यांच्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट देखील केली आहे.
माझ्यावर खोटे, बेछूट आरोप
धनंजय मुंडे यांनी लिहिले आहे की, अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुस-यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणा-या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे, असे स्पष्ट मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.