30.3 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeसंपादकीयदिल्लीच्या तख्तावर भाजप

दिल्लीच्या तख्तावर भाजप

दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे सा-या देशाचे लक्ष लागले होते. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष चौथ्यांदा सत्तेवर येणार की २७ वर्षांनंतर भाजप सत्ता स्थापन करणार याबाबत उत्सुकता होती. यंदाच्या निवडणुकीत ६९९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार होता. भाजप व आम आदमी पक्ष (आप) यांच्यात काँटे की टक्कर होती. ५ फेब्रुवारीला शांततेत मतदान पार पडल्यानंतर ‘आप’ दिल्लीच्या सत्तेतून हद्दपार होणार आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा कौल बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी दिला होता. दिल्लीत आप व भाजपमध्ये थेट लढत होत असल्याने आप तिस-यांदा सत्ता पादाक्रांत करणार असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता, तर भाजपला ५० जागा मिळतील असा विश्वास पक्षाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केला होता. गत दोन निवडणुकांत एकही जागा जिंकू न शकलेल्या काँग्रेसलाही सत्ता मिळण्याची आशा होती. शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रारंभीच गेली १२ वर्षे दिल्लीवर राज्य करणा-या ‘आप’ला ‘झाडून’ बाजूला सारत दिल्लीकर मतदार विधानसभेची सत्ता भाजपच्या हाती देणार हे चित्र स्पष्ट दिसू लागले.

दिल्लीकरांनी बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष खरे ठरवत भाजपच्या हाती तब्बल २७ वर्षांनंतर ‘सत्ता सोपान’ सुपुर्द केला. जवळपास १५ वर्षांपासून सत्तारूढ असलेल्या आम आदमी पक्षाच्या अभेद्य भिंतीला ‘आम आदमीं’नीच मोठे भगदाड पाडले. इतकेच नव्हे तर पक्षाचे चार मजबूत खांबही उखडून टाकले. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सोमनाथ भारती, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांसारख्या दिग्गजांना पराभवाची चव चाखायला लावली. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी, गोपाल राय, मुकेश अहलावत, इम्रान हुसेन यांनी विजय मिळवत पक्षाची थोडीफार लाज राखली. काँग्रेसला गत निवडणुकीप्रमाणे यंदाही भोपळा फोडता आला नाही. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ जागांवर विजय मिळवत भाजपने जोरदार मुसंडी मारली. सत्तारूढ ‘आप’ला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले.

काँग्रेस व इतर पक्षांना आपले खातेही उघडता आले नाही. निवडणुकीत संदीप दीक्षित, अलका लांबा आणि रमेश बिधुरी या ‘आप’च्या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. अरविंद केजरीवाल ४०८९ मतांनी, मनीष सिसोदिया ६७५ मतांनी पराभूत झाले तर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी ३५२१ मतांनी विजयी झाल्या. दिल्लीत १ कोटी ५६ लाख मतदार असून १३ हजार ७६६ मतदान केंद्रांत मतप्रक्रिया पार पडली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे परवेश वर्मा आणि तरबिंदर सिंग हे जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी अनुक्रमे अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांचा पराभव केला. जाट समाजाचे नेते परवेश वर्मा हे दक्षिण दिल्ली मतदारसंघातून दोन वेळा खासदार होते. आता त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेबसिंग वर्मा यांचे ते पुत्र आहेत.

‘आम आदमी’चे नाव घेऊन बारा वर्षे दिल्लीवर राज्य करणा-या ‘आप’ला बाजूला सारून दिल्लीकरांनी विधानसभेची सत्ता भाजपच्या हाती सोपवली. निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर दिलेल्या प्राप्तिकर मुक्तीचा परिणाम दिल्लीच्या निकालावर दिसून आला आणि ‘आप’चे १२ वाजले. ‘आप’च्या पराभवाची कारणमीमांसा करताना असे म्हटले जात आहे की, साधी राहणी आणि प्रामाणिक राजकारण या ‘आप’च्या प्रतिमेला नेत्यांच्या ऐषआरामाच्या जीवनशैलीमुळे तडा गेला. भ्रष्टाचाराचे आरोप आणि मद्य घोटाळ्यातील अडकलेले मंत्री ‘आप’चे स्वच्छ राजकारण हे प्रतिमान मोठ्या प्रमाणावर ढासळले. विविध मुद्यांवर केंद्राशी टोकाची संघर्षाची भूमिका घेतल्याने मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली. दारू, पैशाच्या लोभापायी केजरीवाल यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. मी अनेक काळापासून सांगतोय, निवडणूक लढताना उमेदवाराकडे चांगले चारित्र्य असायला हवे, चांगले विचार हवेत, उमेदवाराच्या प्रतिमेवर कोणताही डाग असायला नको.

मात्र त्यांना ते लक्षातच आले नाही. ते दारू आणि पैशात गुरफटून गेले, अशी प्रतिक्रिया समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षासोबत आप असता तर असा निकाल लागला नसता असे आप आणि आघाडीतील मित्र पक्षांकडून सांगितले जात आहे. त्यावर बोलताना काँग्रेसच्या सुप्रिया नेत म्हणाल्या, आम आदमी पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली नाही. आम्ही काही एनजीओ नाही. आम्ही देखील एक राजकीय पक्ष आहोत. ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी विजयाबद्दल भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीच्या जनतेने भाजपला ज्या गोष्टीसाठी मते दिली आहेत ती विधायक कामे भविष्यात भाजपकडून नीट पार पाडली जातील अशी आशा करतो. अराजकता, अहंकार आणि ‘आप’चाही शेवट झाला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दिल्ली निवडणुकीत मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. दिल्लीकरांचे कर्ज आम्ही विकासाच्या रूपाने परत करू. राजकारणात शॉर्टकटसाठी, भ्रष्टाचारासाठी, खोट्या गोष्टींसाठी मुळीच जागा नाही असे पंतप्रधान म्हणाले.

भाजपला जे ऐतिहासिक यश मिळाले त्यामागे आरएसएस आणि अन्य संघटनांचे भक्कम काम आहे. प्रचाराच्या मागे संघटनात्मक बळ मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते. मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी अर्थसंकल्पातील करसवलतीचा प्रभावी वापर कारणीभूत ठरला. रस्ते, पाणीपुरवठा, प्रदूषण आणि बंद पडलेले मोहल्ला क्लिनिक्स यासारख्या मुद्यांवर भाजपने विशेष भर दिला होता. ‘आप’ला काँग्रेस व एमआयएम या दोन्ही पक्षांचा फटका बसल्याचे मानले जात आहे. मुस्तफाबादसारख्या काही मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतांचे विभाजन झाले शिवाय दलित मतेही काँग्रेसकडे वळल्याचा अंदाज आहे. सुमारे १३ जागांवर काँग्रेसची मते निर्णायक ठरल्याचेही बोलले जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचे लक्ष मुंबई मनपा आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर आहे. त्यादृष्टीने त्यांच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. ‘आप’च्या चिन्हानेच त्यांची सफाई केली असे म्हणावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR