देशाची राजधानी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे शुक्रवारी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मोठ्या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तब्बल ७१ वर्षांपूर्वी म्हणजे १९५४ साली ३७ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले होते. त्या संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती आणि अ. भा. मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात नव्हते.
त्यानंतर आता ७० वर्षांनी यंदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आणि ते मराठी संस्कृतीच्या अभिमानाचा एक ऐतिहासिक ठेवा ठरले. राजधानीत संमेलन होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि दिल्लीतील मराठीप्रेमींमध्ये त्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. यंदाच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन उद्घाटन सोहळे पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ फेबु्रवारी रोजी विज्ञान भवन येथे संमेलनाचे उद्घाटन झाले. तर याच दिवशी संध्याकाळी दुसरा उद्घाटन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात पार पडला. संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र प्रभुणे यांनी डॉ. ताराबाई भवाळकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपुर्द केली. या आधी कधी नव्हे इतकी साहित्य संमेलनाची जाहिरातबाजी सरकारने केली मात्र या जाहिरातींमध्ये संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ताराबाई भवाळकर यांचा फोटोदेखील नव्हता. त्यामुळे साहित्याचा हा उत्सव प्रत्यक्षात राजकीय फायद्यासाठी ‘हायजॅक’ केला जात असल्याची टीका साहित्यिकांनी, मराठीप्रेमींनी केली ती रास्तच म्हटली पाहिजे.
संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर यांनी विज्ञान भवनात रंगलेल्या उद्घाटन कार्यक्रमात, ‘शंभर उणे दोन’वे संमेलन ही लोकभाषा व ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही अभिजात भाषा असे सांगत भाषणाला सुरुवात केली आणि त्यांच्या या उत्स्फूर्त संवादाला वारंवार दाद मिळत गेली. दिल्लीत सात दशकांपूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ‘आज फार काही बोलायचे नाही, असा मला दम देण्यात आला आहे’ असे त्यांनी मोठ्या हिमतीने सांगितले. यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर तर स्वागताध्यक्ष खा. शरद पवार आणि संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात पंतप्रधान मोदी यांचे योगदान नाकारता येणार नाही. मात्र साहित्य संमेलनाच्या प्रांगणात साहित्यिक कमी आणि राजकारणीच अधिक दिसून येत होते.
शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन झाले त्यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर एका कोप-यात बसलेल्या दिसून आल्या. वास्तविक त्यांचे स्थान उद्घाटक पंतप्रधान मोदी आणि स्वागताध्यक्ष खा. शरद पवार यांच्यामध्ये असायला हवे होते. मात्र पुन्हा एकदा व्यासपीठावर राजकारण्यांचीच मांदियाळी दिसून आली. त्यामुळे मंचावर साहित्यिकांना दुय्यम वागणूक मिळाल्याचे दिसून आले. मात्र व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी केलेले भाषण अप्रतिम असेच होते. प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे असे हे भाषण होते. व्यासपीठावर पंतप्रधान आहेत, आपण राजधानीत बोलतो आहोत असा कोणताच संकोच न बाळगता डॉ. तारा भवाळकर यांनी आपली मते ठामपणे मांडली. खरे तर आजकाल साहित्यिक कोणाच्या तरी दावणीला बांधल्यासारखे त्यांचा उदो उदो करत असतात. आपल्या पाठीचा कणा ताठ आहे हेच ही मंडळी विसरतात. मात्र, डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या पाठीचा कणा ताठ असल्याचे ठणकावून सांगितले. त्यांनी विठूरायाचा उदारमतवाद, त्यांच्या जाणिवा..नेणीवा इतक्या सुंदर पद्धतीने मांडल्या की, त्यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या पडत होत्या.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिला म्हणून बहुमान मिळण्यापेक्षा गुणवत्तेला आणि इथल्या व्यवस्थेला जोरदार टोला लगावला. त्यांच्या उद्घाटक भाषणात त्यांनी संत ज्ञानेश्वर, एकनाथ यांचा आवर्जून उल्लेख केला पण संत तुकारामांचे नाव घेतले नाही असा त्यांच्यावर टीकेचा सूर निघाला मात्र, त्यांनी नंतर केलेल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांचाच उल्लेख करत अध्यक्षपदाची उंची वाढवली असेच म्हणावे लागेल. त्यांचे भाषण पंतप्रधान मोदी मन लावून ऐकत होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राजधानीत मराठी माणसाने पुन्हा एकदा आपली छावणी टाकली आहे असे म्हणता येईल. राजधानीत मराठीचा जागर होत आहे. तो दाहीदिशांना घुमणार यात शंका नाही. वास्तविक पाहता या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होण्याचा बहुमान डॉ. तारा भवाळकर यांना मिळाला हाच मराठीचा मोठा गौरव आहे. डॉ. भवाळकर यांनी आपल्या प्रांतात विस्तृत लेखन केले आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन त्यांनी केले आहे.
देशाच्या इतिहासात आणि साहित्यात मराठी भाषेने भरीव योगदान दिले आहे. मराठी ही एक संपूर्ण भाषा आहे. मराठीत शौर्य आणि धाडस आहे. मराठीत सौंदर्य आहे, संवेदनशीलता आहे, समता आहे, सुसंवाद, शक्ती, युक्ती आणि ज्ञान आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मराठीचा गौरव केला. दिल्लीसारख्या बहुभाषिक आणि बहुसंस्कृतिक शहरात मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे ही मोठी जबाबदारी होती. यामुळे मराठी संस्कृतीची ओळख देशभरात अधिक ठळकपणे होण्याची संधी मिळाली. संमेलनाच्या निमित्ताने संपूर्ण दिल्लीमध्ये मराठीचा जयघोष झाला. महाराष्ट्राचा इतिहास संस्कृती आणि साहित्याचा भव्य वारसा राजधानीत दाखवण्याची संधी मिळाली. दिल्लीसारख्या बहुभाषिक महानगरात मराठी साहित्याचा जागर घडवण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. भविष्यात हे संमेलन मराठी भाषेच्या विकासासाठी नवी दिशा देणारे ठरेल अशी आशा करू या!