पुणे : प्रतिनिधी
पुढील महिन्यात दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास जाण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून दिल्लीस येणा-या साहित्यिकांची अडचण होऊ नये यासाठी रेल्वेच्या प्रवासासाठी सशुल्क नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या सुविधेनुसार सुरुवातीला रुपये १५०० भरून नोंदणी करता येणार आहे. तसा निर्णय मराठी साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्थेने घेतला आहे. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणि आयोजक संजय नाहर यांनी ही माहिती सांगितली. ते म्हणाले, या रेल्वे साथी भरावी लागणारी रक्कम मूल तिकिटाच्या तीन पट असून यामध्ये सवलत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रेल्वे मंत्रालयाने सवलतीबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही आणि म्हणून सरहद्द संस्था आणि महामंडळ यांच्या वतीने सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे.
ही रेल्वे दि १९ रोजी पुण्यातून सुटणार असून २० रोजी दिल्लीस पोहोचेल तर संमेलन पूर्ण झाल्यावर दि २३ रोजी निघून दि २४ ला पुण्यात येणार आहे .पुणे-दिल्ली प्रवासात जाताना जळगाव आणि ग्वाल्हेर येथे तर परतीच्या प्रवासात भोपाळ आणि मनमाड येथे थांबे असणार आहेत असे ते म्हणाले.