28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदुर्मिळ रत्न हरपले...!

दुर्मिळ रत्न हरपले…!

मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली रतन टाटा यांना आदरांजली

मुंबई : प्रतिनिधी
प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.
उद्योगक्षेत्रातील चाणक्य आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे. जगभरातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, त्यांचे उपचारादरम्यानच निधन झाले. उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.

नैतिकता, उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम : मुख्यमंत्री शिंदे
रतन टाटा यांच्यावर मृत्यूनंतर भावना व्यक्त करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दुर्मिळ रत्न हरपले… नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा ग्रुपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार केले जातील.
रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील. रतनजी टाटा यांनी अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना टेकओव्हर करून व्यवसाय वाढवला. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांतही त्यांनी दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रुपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रुपचा विस्तार केला. आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सळाळते चैतन्य निर्माण केले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास करण्याची टाटांची विचारधारा आणि परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. रतनजी टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी होती. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

अतिशय मोठ्या मनाची व्यक्ती : उपमुख्यमंत्री फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रतन टाटा हे केवळ यशस्वी उद्योगपतीच नव्हते तर अतिशय मोठ्या मनाची व्यक्ती होती. रतन टाटा यांनी देशामध्ये उद्योग तर सुरू केलेच पण त्याचबरोबर एक मोठी विश्वासार्हता उभी केली. आणि टाटा हा ब्रॅण्ड ग्लोबल केला. जगाच्या पाठीवर विश्वास मिळवला. पण त्याचवेळी आपली सगळी संपत्ती ही टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विश्वस्त व्यवस्थेमध्ये त्यांनी ठेवली. या टाटा ट्रस्टने जे समाजोपयोगी काम केले आहे, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये केलेले जे काम आहे, या सर्व गोष्टी आदर्शनीय आहेत. रतन टाटा हे असे व्यक्ती आहेत जे स्वत:पेक्षा समाजासाठी आणि देशासाठी जास्त जगले आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे देशाचं फार मोठं नुकसान आहे. त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

टाटांच्या जाण्याने अतिशय दु:ख : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांनी लिहिले आहे की, दिग्गज उद्योगपती आणि समाजसेवी यांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले. रतन टाटा एक उद्योगपती म्हणून त्यांच्या अमूल्य योगदानाव्यतिरिक्त, त्यांनी परोपकार आणि करुणेचा वारसा ठेवला आहे, जो त्यांच्या देशावरील अपार प्रेमाने अधोरेखित झाला आहे. या दु:खाच्या वेळी माझ्या प्रार्थना त्यांच्या प्रियजनांसोबत आणि लाखो चाहते आणि हितचिंतकांसोबत आहेत, अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR