शेतकरी संतप्त, थेट कृषिमंत्र्यांना काजू-बदाम भेट देऊन निषेध
नांदेड, हिंगोली जिल्ह्यात सरकारविरोधात आंदोलन
नांदेड/हिंगोली : प्रतिनिधी
मराठवाड्यासह राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि करपणा-या पिकांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या स्थितीत शेतक-यांचे प्रश्न आणि व्यथा समजून घेण्यासाठी शनिवारी कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दुष्काळाचे भीषण वास्तव आणि शेतकरी संकटावर गांभीर्याने चर्चा करण्याऐवजी मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी समोर ठेवलेल्या थाळीतील काजू, बदाम, सुकामेव्याचा आस्वाद घेण्यात मग्न असल्याचे समोर आले. या प्रकारचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हिंगोली जिल्ह्यातही शेतक-यांनी कृषिमंत्र्यांना थेट काजू, बदाम भेट देऊन अनोखा निषेध नोंदवला.
नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुष्काळ आणि टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी दुष्काळात होरपळणा-या मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री अतुल सावे, मंत्री मेघना बोर्डीकर, खा. रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणा-या मराठवाड्यातील पिकांची स्थिती, शेतकरी मदत, पाणी टंचाई, चारा टंचाई, शेतक-यांची स्थिती यासह मराठवाड्यातील सध्याच्या आणि भविष्यात उद्भवणा-या प्रश्नांवर गांभीर्यपूर्वक आणि अतिशय सखोलपणे चर्चा व्हायला पाहिजे होती. सुरुवातीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सत्कार टाळला. परंतु बैठकीत दुष्काळावर सखोल चर्चा होण्याऐवजी खासदार, आमदार, अधिका-यांनी काजू-बदाम खाण्यातच अधिक रस दाखविला. यासंबंधीचा व्हीडीओ व्हायरल होताच विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटले असून, सर्वच स्तरातून याचा निषेध करण्यात येत आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना तर हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांनी काजू-बदाम भेट देत तीव्र निषेध नोंदवला. वसमत येथील शेती पाहणी दौ-यावर असताना शेतक-यांनी त्यांना झाडाच्या पानांवर काजू, बदाम ठेवून भेट दिले. साहेब शेतकरी दुष्काळाने मरतोय आणि तुम्ही बैठकांमध्ये काजू, बदाम खाताय, हे घ्या तुम्हीच खा, अशा शब्दांत शेतक-यांनी संताप व्यक्त केला. शेतक-यांनीही कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
या घटनेवर बोलताना भरणेंनी नांदेडमधील वादावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, त्यांच्यासमोर काजू-बदाम नव्हते. मात्र चार तास चाललेल्या बैठकीत अधिकारी वर्गापैकी आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी ते घेतले असावेत, असे म्हटले. हे चुकीचे होते, अशी कबुलीही त्यांनी दिली. तत्पूर्वी नांदेड जिल्ह्यातही कृषिमंत्र्यांना कॉंग्रेसचे आंदोलन आणि शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
मुख्यमंत्र्यांची नाराजी
या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासनाचे कान उपटले. दुष्काळासारख्या संवेदनशील विषयाच्या बैठकीत अशा गोष्टी टाळायला हव्या होत्या, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.
विरोधकांकडून टीकेची झोड
यावरून विरोधकही आक्रमक झाले असून, विरोधकांनी सत्ताधारी नेते आणि प्रशासकीय अधिका-यांवर टीकेची झोड उठवली. शेतकरी संकटात असताना अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना स्वत:च्या आदरातिथ्याचीच जास्त काळजी असल्याचा संताप सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
कृषिमंत्र्यांचा ताफा
वसमतमध्ये अडविला
वसमत तालुक्यातील (जि. हिंगोली) टाकळगाव शिवारात पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने अडवला. संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर उतरून काजू, बदाम खायेंगे, दुष्काळ पाहणी करेंगे अशा उपरोधिक घोषणा दिल्या. यामुळे घटनास्थळी तणाव वाढला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाट मोकळी करून दिली.
सरकारला दुष्काळाचे
अद्याप गांभीर्य नाही
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असली तरी सरकारला याबाबत कुठलेही गांभीर्य नाही. ते दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदाम खात बसले आहेत. राज्य शासनाने या भयावह संकटाची गंभीर दखल घेत तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळावर विस्तृत चर्चा करून शेतक-यांना दिलासा द्यावा, असे म्हटले.
















