पुणे : प्रतिनिधी – विज्ञान-तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणा-यांनाही कलेची ओढ असू शकते. कला क्षेत्रात संशोधकवृत्ती आणि संशोधन क्षेत्रात कलेची भूमिका असू शकते. तंत्रज्ञानाबरोबरच कलांचे शिक्षण देणारी संयुक्त प्रणाली असावी, अशी अपेक्षा शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली.
गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने पंडित जितेंद्र अभिषेकी आणि विदूषी किशोरी अमोणकर यांच्या शिष्या, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका विदुषी देवकी पंडित यांना डॉ. भटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या वेळी डॉ. भटकर बोलत होते.
खासदार, डॉ. मेधा कुलकर्णी, गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी., गानवर्धनच्या कार्याध्यक्ष वासंती ब्रह्मे मंचावर होते. शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ आणि पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. भटकर म्हणाले,आपल्या देशाच्या संस्कृतीची ओळख संगीताच्या माध्यमातून करून देण्यासाठी कार्यरत असणा-या गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशन या संस्थांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोणत्याही क्षेत्रात सराव अत्यंत आवश्यक असून संशोधक वृत्तीने प्रयोग करणे अपेक्षित आहे. शास्त्रीय संगीत ही कला मानसिक शांतता देणारी आहे.
सत्काराला उत्तर देताना देवकी पंडित म्हणाल्या, प्रभाताई संगीतरूपाने आजही आपल्यात आहेत. त्यांच्या प्रेरणादायक सांगीतिक वाटचालीतून आम्हा कलाकारांना संगीताच्या क्षेत्रात काही घडविण्याची उर्मी मिळेल. आम्हा कलाकारांच्या मनात प्रभाताईंविषयी कायमच प्रेम, आत्मीयता आणि आदर आहे. डॉ. भटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्याने आपण भाग्यवंत आहोत,
प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना दयानंद घोटकर म्हणाले, रसिकांवर सूररूपाने आभाळमाया करणा-या देवकी पंडित यांना पुरस्कार देताना कर्तव्यपूर्तीचे समाधान आहे. शारंग नातू म्हणाले, देवकी पंडित यांचे सूर निकोप आणि निरलस आहेत. प्रभाताईंच्या नावे त्यांना दिला गेलेला मानाचा पुरस्कार त्यांच्या पुढील सांगीतिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल.
स्वरप्रभा व गानवर्धन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेतील विजेत्या मयुरी अत्रे, सुरभी सुरेश, वाणीश्री धन्वंतरी, श्रुती वैद्य, सहाना हेगडे यांचा देवकी पंडित यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्पर्धेविषयी विश्वस्त डॉ. विद्या गोखले यांनी माहिती दिली. मानपत्राचे वाचन वासंती ब्रह्मे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. नीलिमा राडकर यांचे होते. स्वागत दयानंद घोटकर, शारंग नातू, वासंती ब्रह्मे यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर विदुषी देवकी पंडित यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली होती.